जायकवाडीत पाणी पोहोचणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:57 PM2018-10-27T22:57:55+5:302018-10-27T22:58:19+5:30

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ आवळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश निघाले. मात्र या आदेशानंतर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी शांत बसले असून, पाणी अडविण्यासाठी नगर, नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिले आहे.

When will water reach Jaikwadi? | जायकवाडीत पाणी पोहोचणार कधी?

जायकवाडीत पाणी पोहोचणार कधी?

googlenewsNext
ठळक मुद्देअवघ्या मराठवाड्याचे लक्ष : नगर, नाशिकमध्ये विरोध, मराठवाड्यात मात्र सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एका बैठकीनंतर शांत

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ आवळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश निघाले. मात्र या आदेशानंतर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी शांत बसले असून, पाणी अडविण्यासाठी नगर, नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिले आहे. परिणामी, जायकवाडीत हक्काचे पाणी कधी पोहोचणार, याकडे अवघ्या मराठवाड्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
जायकवाडी धरणासाठी दारणा, गंगापूर व पालखेड धरण समूहातील धरणांतून २६ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु आंदोलनामुळे आता नाशिक जिल्ह्यातील तीनही धरण समूहातून सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले जाणार आहे. नगरमध्येही पाणी सोडण्यासाठी विरोध होत आहे. मुळा धरणातून शनिवारी पाणी सोडण्यात येणार होते. परंतु सायंकाळपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही, अशी माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात १५ आॅक्टोबर रोजी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीच्या सात दिवसांनंतर २३ आॅक्टोबर रोजी ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरण समूहातून ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. नाशिकच्या मुख्य अभियंत्यांनी या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी, असे म्हटले होते. त्यानुसार तात्काळ अंमलबजावणी होण्याची गरज होती. परंतु पाणी सोडण्यासाठी पूर्वतयारी आणि नंतर आंदोलनामुळे उशीर होत असल्याचे कारण नगर, नाशिक जिल्ह्यांतील पाटबंधारे विभागाचे अधिकारी पुढे करीत आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील अधिकारीही पाणी सोडण्याच्या विरोधात असल्याची ओरड होत आहे. पाणी प्रश्न पेटणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी जायकवाडीत कधी पाणी येणार, याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार असणाºयांवर कारवाईची मागणी मराठवाड्यातून पुढे येत आहे.
मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी कुठे?
नगर, नाशिकमध्ये पाणी अडविण्यासाठी आंदोलने उभी राहिली. परंतु मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी २२ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत मनोगत व्यक्त करून शांत बसले आहेत. या परिषदेनंतर आदेश निघाले, मात्र पाणी जायकवाडीत पोहोचेल, यासाठी कोणतीही भूमिका सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून घेतली जात नसल्यामुळे नाराजीचा सूर मराठवाड्यातून व्यक्त होत आहे.
आदेशाचे अनुपालन नाही तर शिक्षा
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिक रण कायद्यातील क लम क्रमांक २६ या अधिनियमाखालील आदेशाचे अनुपालन न केल्यास कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडण्यास होत असलेल्या विलंबासाठी संबंधित अधिकाºयांवर कारवाई होऊ शकते. आदेशाचे अनुपालन न केल्याबद्दल अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी गत आठवड्यात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केलेली आहे.
निळवंडेतून आज सोडणार पाणी
भंडारदरा धरणातून २५ आॅक्टोबर रोजी पाणी सोडण्यात आले आहे. परंतु हे पाणी प्रथम निळवंडे धरणात जमा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात दोन ते तीन दिवसांत पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार निळवंडेतून जायकवाडीसाठी रविवारी पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: When will water reach Jaikwadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.