छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागणार तरी कधी?
By स. सो. खंडाळकर | Updated: September 3, 2025 20:13 IST2025-09-03T20:12:17+5:302025-09-03T20:13:48+5:30
विकास मीना यांना तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी साधायचा होता मुहूर्त

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागणार तरी कधी?
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेची नूतन इमारत सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. याला मुहूर्त कधी लागणार हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अंकित यांच्या आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना तर यंदाच हा मुहूर्त १७ सप्टेंबर २०२५ रोजी म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी साधायचा होता. आता ते येथून बदलून जिल्हाधिकारी म्हणून अमरावतीला रुजू झालेले आहेत. ते तिकडे गेले आणि इकडे नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा विषय थंड बस्त्यात पडला.
काही जाणकारांकडून माहिती घेतली असता, या १७ सप्टेंबरचा मुहूर्त तर सोडाच, पुढच्या १७ सप्टेंबरपर्यंतही उद्घाटन होणार नाही. ही ३ मजली इमारत बाहेरून फारच छान दिसते. परंतु आतून पाहणी केली असता, तेथे अनेक समस्या निर्माण झाल्याचे कळते. आत व्हेंटीलेशनचीही सोय नाही.
एमएसईबी व जिल्हा परिषदेत सुरू आहे साठमारी
जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीला हवा असलेला विद्युत पुरवठा कसा मिळेल, या चिंतेत प्रशासन आहे. एमएसईबी त्या भागासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडेच जागेची मागणी करीत आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास आम्हाला मोफत वीज द्या, अशी भूमिका जिल्हा परिषदेची आहे. कारण मग त्याच ट्रान्स्फॉर्मरवरून तुम्ही इतरांंनाही विद्युत पुरवठा करून धंदा करणार असे जिल्हा परिषदेला वाटते. यातून कसा तोडगा निघतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
फर्निचरसाठी हवेत १० कोटी
नूतन इमारतीच्या बांधकामावर आतापर्यंत शासनाकडून सुमारे ४,४४९.४४ लाखांचा निधी प्राप्त झाला. आतापर्यंत ४,४४८.६२ लाख रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित १५ कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. विद्युत पुरवठा कामांसाठी ९ कोटींची तर फर्निचरसाठी १० कोटी ३५ लाखांची मागणी करण्यात आली आहे. शासनाने अलीकडेच विद्युतीकरणाच्या कामासाठी जिल्हा परिषद उपकरातून ६ कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी दिलेली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून देण्यात आली.