काय ? २४ तास पाणी मिळण्यासाठी घेतले थेट जलकुंभावरून नळ कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 18:01 IST2022-12-21T17:54:21+5:302022-12-21T18:01:28+5:30
अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांना सुरक्षा कवच पुरविण्याचे काम आजपर्यंत मनपाच्याच कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे नागरिकांचे धाडस वाढत गेले.

काय ? २४ तास पाणी मिळण्यासाठी घेतले थेट जलकुंभावरून नळ कनेक्शन!
औरंगाबाद : मुख्य जलवाहिनीवरून थेट २४ तास पाणी मिळविण्यासाठी असंख्य नागरिकांनी अनधिकृतपणे नळ कनेक्शन घेतले आहेत. पण एखाद्या जलकुंभावरून नळ कनेक्शन दिल्याचा अनोखा प्रकार पहिल्यांदाच उघडकीस आला आहे. महापालिका प्रशासनाने मंगळवारी संबंधित नळ कनेक्शन कट केले. क्रांती चौकातील जलकुंभातून हे कनेक्शन देण्यात आले होते.
अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांना सुरक्षा कवच पुरविण्याचे काम आजपर्यंत मनपाच्याच कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे नागरिकांचे धाडस वाढत गेले. शहरात आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक नळ कनेक्शन तोडण्यात आले. मुख्य जलवाहिनीवरील शेकडो नळ बंद करण्यात आले. बहुतांश ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने नळ देण्यात आले. क्रांती चौक येथील एका प्रसिद्ध हॉटेलला थेट कोटला कॉलनी जलकुंभावरून नळ कनेक्शन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
एक इंच व्यासाचे हे कनेक्शन तोडण्यात आले. पथक क्रमांक १ चे प्रमुख संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपअभियंता मिलिंद भामरे, पथक अभियंता रोहित इंगळे, अभियंता एस. एस. गायकवाड, अभियंता सुमित बोराडे, अभियंता सचिन वेलदोडे, कर्मचारी मोहम्मद शरीफ, तमिज पठाण, वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार, उमेश दाणे यांनी केली.