कसली दिवाळी ? दागिने मोडले तरी मुलाला ऐकू येणार नाही, पैशांसाठी आईची धडपड
By संतोष हिरेमठ | Updated: October 20, 2025 18:26 IST2025-10-20T18:25:56+5:302025-10-20T18:26:41+5:30
मुलाच्या ३.६७ लाखांच्या यंत्रासाठी आईची ८ महिन्यांपासून धडपड

कसली दिवाळी ? दागिने मोडले तरी मुलाला ऐकू येणार नाही, पैशांसाठी आईची धडपड
छत्रपती संभाजीनगर : ‘मी शाळेत मावशी म्हणून काम करते. सोबत काही घरांमध्ये काम करते. पती रिक्षा चालवितात. १६ वर्षीय मुलाला ऐकू येणे थांबले. कारण ‘काॅक्लियर इम्प्लांट’ची मशीन बंद पडली. या मशीनची किंमत ३.६७ लाख रुपये आहे. ८ महिन्यांपासून शासनाच्या विविध योजनांसाठी प्रयत्न करीत आहे; परंतु कुठूनही मदत झाली नाही. दागिने मोडण्याचा विचार करतेय. मात्र, त्यातूनही ही रक्कम जमा होणार नाही. आमच्यासाठी कसली दिवाळी? सध्या मुलाला ऐकू कधी येणार, हीच चिंता सतावत आहे’, असे नंदा पद्माकर रिठे म्हणाल्या.
चिकलठाणा येथील रहिवासी असलेल्या नंदा रिठे यांचा मुलगा अमित पद्माकर रिठे हा १६ वर्षांचा आहे. सगळे काही सुरळीत सुरू होते; परंतु ८ दिवसांपूर्वी त्याला ऐकू येणेच बंद झाले. कारण, त्याच्या कानाचे ‘काॅक्लियर इम्प्लांट’चे मशीन बंद पडले. मशीन बंद पडल्यापासून शाळेत शिक्षक काय शिकवितात, हे त्याला समजेना झाले. मित्र काय बोलतात, हे कळत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गेल्या ८ महिन्यांपासून मशीनसाठी लागणारी तब्बल ३.६७ लाख रुपय कशी जमा होईल, याच प्रयत्नात आहे. परंतु, कुठूनही त्यांना आधार मिळाला नाही. त्यामुळे या आईने मदतीचे आवाहन केले आहे.
सगळीकडे अर्ज, पण...
सहा वर्षांचा असताना, अमितची ‘काॅक्लियर इम्प्लांट’ची शस्त्रक्रिया झाली होती. आठ महिन्यांपूर्वी मशीन अचानक बंद पडली. अर्ज करून कोणत्याही योजनेचा आधार मिळत नाही. अमितचे वडील रिक्षा चालवितात. मी घरकाम करते. मशीनसाठी आता ३.६७ लाख रुपये जमा करू शकत नाही.
- नंदा पद्माकर रिठे, आई.