काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा

By राम शिनगारे | Published: August 19, 2023 01:11 PM2023-08-19T13:11:54+5:302023-08-19T13:12:22+5:30

एकाच उमेदवाराने सादर केली वेगवेगळी आठ अनुभव प्रमाणपत्रे

what do you say Scam in the recruitment of 772 posts in 'ITI' | काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा

काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : आयटीआय संस्थांमधील सुरू असलेल्या नोकरभरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ७७२ पदांची नोकरभरतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एकाच उमेदवाराने आठ पदांसाठी वेगवेगळ्या प्रकारची बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करून परीक्षा देत गुणवत्ता यादी स्थान पटकावल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक (तांत्रिक), मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक, वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या पदांचा समावेश आहे. कोणत्याही पदांसाठी अर्ज करताना दोन वर्षे अनुभव प्रमाणपत्र सादर करण्याची अट होती. शेकडो उमेदवारांनी आठही पदांसाठीची एकाच कंपनीकडून वेगवेगळी बनावट अनुभव प्रमाणपत्रे हस्तगत करीत अर्ज केले. या पदांसाठी वेगवेगळ्या वेळी ऑनलाइन परीक्षा 'टीसीएस' संस्थेने घेतली. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यामध्ये भांडारपालाच्या जागेसाठी अनुभव प्रमाणपत्र सादर करणारा उमेदवार तांत्रिक पदासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षा देऊन प्राथमिक गुणवत्ता यादीत झळकला. विशेष म्हणजे शेकडो उमेदवारांनी आठही जागांसाठी बनावट अनुभव प्रमाणपत्रांच्या आधारे परीक्षा दिल्याचे गुणवत्ता यादीवरून स्पष्ट झाले आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना पायबंद घालण्याची मागणी 'डीव्हीईटी' संचालकांकडे उमेदवारांनी केली आहे. याविषयी 'डीव्हीईटी'चे संचालक दिगंबर दळवी यांना विचारले असता, त्यांनी याविषयी काहीही बोलायचे नसल्याचे सांगितले.

...तर उच्च न्यायालयात धाव घेणार
बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे सर्वच जागांवर परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यापूर्वी संबंधितांचे अनुभव प्रमाणपत्र तपासून घ्यावे, अशी मागणी करणारे निवेदन डीव्हीईटीच्या संचालकांना दिले. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार सुभाष सुसलादे, राम शिंदे, शुभम दसे, विकास सोनवणे आदींनी दिली.

Web Title: what do you say Scam in the recruitment of 772 posts in 'ITI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.