Video:आकाशात जे दिसले ते 'बाॅल लायटनिंग',ही नैसर्गिक भौतिकशास्त्रीय घटना;शास्त्रज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 14:24 IST2022-04-04T13:49:13+5:302022-04-04T14:24:19+5:30
महाराष्ट्रातील जिल्ह्यांत सध्या ‘बाॅल लायटनिंग’ च्या दिसणाऱ्या घटना या पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी घाबरू नये.

Video:आकाशात जे दिसले ते 'बाॅल लायटनिंग',ही नैसर्गिक भौतिकशास्त्रीय घटना;शास्त्रज्ञांचा दावा
औरंगाबाद : महाराष्ट्रात जळगाव,नाशिक, नंदूरबार, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, वाशिम, अकोला, चंद्रपूर, बुलडाणा इ. अनेक जिल्ह्यांत जमिनीला समांतर जाणारे प्रकाशाचे गोळे नागरिकांनी पाहून घबराट निर्माण झाली. मात्र ही नैसर्गिक भौतिकशास्त्रीय घटना आहे. शनिवारी आकाशात जे दिसले ते 'बाॅल लायटनिंग' असल्याचा दावा हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केला.
प्रा. जोहरे यांनी सांगितले, महाराष्ट्रातील जिल्ह्यांत सध्या ‘बाॅल लायटनिंग’ च्या दिसणाऱ्या घटना या पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी घाबरू नये. समांतर जाणारे विजेचे गोळे म्हणजे ‘बाॅल लायटनिंग’ हा आकाशातून पडणाऱ्या विजांचा प्रकार आहे. उल्का किंवा उपग्रहाचे तुकडे हे वरून खालच्या दिशेला पडतात.
२००२ साली उत्तर प्रदेशात अशा प्रकारे ‘बाॅल लायटनिंग’ म्हणजे विजेचे गोळे दिसले होते. हा विजांचा प्रकार असून शनिवारची घटना पूर्णपणे भौतिकशास्त्रीय आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसलेल्या ‘बाॅल लायटनिंग’नंतर चंद्रपूरपासून १०० किमी अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यात उल्का कोसळल्याची चर्चा आहे. या ठिकाणी आकाशातून मोठी लोखंडी रिंग पडल्याची चर्चा आहे. तो पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह असू शकतो, असा अंदाज केला जात आहे. मात्र त्याचा बाॅल लायटनिंगशी संबंध नसून ती पूर्णपणे वेगळी घटना आहे, असा दावा प्रा. जोहरे यांनी केला.
खुलासा झाला, आकाशात जे दिसले ते 'बाॅल लायटनिंग', ही नैसर्गिक भौतिकशास्त्रीय घटना; शास्त्रज्ञांचा दावाhttps://t.co/X05Q5Ardjkpic.twitter.com/VQ38FdFyYV
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) April 4, 2022
बॉल लायटनिंग म्हणजे काय ?
‘बॉल लायटनिंग’ ही एक वैज्ञानिक घटना आहे. ‘बॉल लायटनिंग’ म्हणजे आकाशातून जमिनीवर पडणारे विजेचे चेंडू किंवा गोळे होय. ‘बॉल ऑफ फायर’ किंवा ‘फायर बॉल’ या नावानेही ते ओळखले जातात. कधी-कधी छोट्या आकारापासून काही मीटर परिघापर्यंत तर कधी टेनिस बॉलच्या आकारापासून फुटबॉलच्या आकारापर्यंत ‘बॉल लायटनिंग’ सूर्यप्रकाशासारखे तप्त असतात. ते ‘तेजोमय विद्युत गोळे’ क्षणात क्षितिज समांतर तर कधी तिरपे किंवा उभे धावताना आकाशात दिसतात.