छत्रपती संभाजीनगरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस कधी? दिल्लीत काहीच हालचाल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:52 IST2025-11-18T18:51:13+5:302025-11-18T18:52:23+5:30
नांदेडकडे पळविलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठच

छत्रपती संभाजीनगरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस कधी? दिल्लीत काहीच हालचाल नाही
छत्रपती संभाजीनगर : आगामी ३ महिन्यांत शहरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी ऑगस्टमध्ये दिले. परंतु ही रेल्वे सुरू करण्यासंदर्भात अद्यापही काही हालचाली नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे नांदेडला पळविलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरहून रिकामीच धावत असल्याची अवस्था आहे.
जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला. विस्तार करताना या रेल्वेची वेळ बदलण्यात आली. त्यामुळे शहरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन खा. डाॅ. भागवत कराड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शहरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली. त्यांनी आगामी ३ महिन्यांत ही रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन ऑगस्टमध्ये दिले. छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या दृष्टीने ‘ऑपरेशनल फिजिबिलिटी चेक’ करण्यात यावे, असे आदेश अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. परंतु तीन महिने होऊनही या नव्या रेल्वेसंदर्भात काही निर्णय का होत नाही, अशी ओरड प्रवाशांतून होत आहे.
७८० आसने रिकामी...
नांदेडला पळविलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या १८ नोव्हेंबर रोजीच्या ७८० आसने रिकामी होती. या रेल्वेचा वेळ बदलल्याने मुंबईला जाण्यास उशीर होत असल्याने प्रवाशांकडून अन्य रेल्वेला प्राधान्य दिले जात आहे.
स्वतंत्र रेल्वे आवश्यक
नोव्हेंबर अर्धा गेला तरी रेल्वेमंत्र्यांनी आश्वासन दिलेली छत्रपती संभाजीनगर- मुंबई स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस अजून घोषित झालेली नाही. मराठवाड्यातील नेत्यांच्या एकमेकांवरील कुरघोडी करण्याच्या वृत्तीमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. छत्रपती संभाजीनगरची क्षमता आणि गरज पाहता सकाळच्या सत्रात स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसची आवश्यकता आहे. रेल्वेमंत्र्यांनी यात लक्ष घालून नवीन वंदे भारत मंजूर करावी.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक
रेल्वेमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार
नव्या वंदे भारत एक्स्प्रेससाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे. पीटलाइनचे काम सध्या बाकी आहे. पीटलाइनचे काम पूर्ण होणेही आवश्यक आहे.
- खा. डाॅ. भागवत कराड