नववर्षाचे स्वागत करा, पण जपून; छत्रपती संभाजीनगरात दीड हजार पोलिस रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:20 IST2025-12-30T16:15:36+5:302025-12-30T16:20:01+5:30
पहाटे ५ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जल्लोष; 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' कारवाईसाठी १५० वाहतूक पोलिसांचे स्वतंत्र पथक

नववर्षाचे स्वागत करा, पण जपून; छत्रपती संभाजीनगरात दीड हजार पोलिस रस्त्यावर
छत्रपती संभाजीनगर : ‘थर्टि फर्स्ट’साठी तरुणाई सज्ज असून शहरातील शंभरावर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जंगी पार्ट्या, डीजे नाइटचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या वर्षाच्या स्वागताला अनुचित प्रकार टाळण्यासाठी दीड हजार पोलिस रस्त्यावर तैनात असतील. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी १५० वाहतूक पोलिसांचे स्वतंत्र पथक असून, ७० चौकांमध्ये प्रत्येकी १ अधिकारी, ५ अंमलदारांचे पथक टवाळखोरांना नियंत्रित ठेवेल.
बुधवारी सायंकाळी ६ वाजेपासूनच शहरात विविध ठिकाणी नववर्षाच्या स्वागतांच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. देशातील प्रसिद्ध डीजेवादकांना आमंत्रित करण्यात आले आहे. पार्ट्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी बाउन्सरलाही यंदा मोठी मागणी वाढली आहे. निवडणुकीच्या काळातच नव्या वर्षाचे स्वागत होत असल्याने पोलिस विभागानेही कठोर भूमिका घेतली आहे. नववर्षाच्या रात्री कायदा हातात घेणारे, सार्वजनिक शांततेचा भंग करणारे, छेडछाड, बेशिस्त वर्तन किंवा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांबाबत कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करा, असा आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला.
मर्यादा ओलांडल्यास कारवाई
बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकरवर गाणे वाजविण्यास परवानगी असेल. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले म्हणाले.
डेसिबल मर्यादा
क्षेत्र : सकाळी ६ ते रात्री १० - रात्री १० ते सकाळी ६
औद्योगिक भाग : ७५-७०
व्यावसायिक भाग : ६५-५५
निवासी भाग : ५५-४५
शांतता क्षेत्र : ५०-४०
असा असेल कडेकोट बंदोबस्त:
-७० चौकांमध्ये प्रत्येकी १ पोलिस अधिकारी व ५ सशस्त्र अंमलदार
-शहराच्या ६ प्रवेशाच्या ठिकाणी ९ पोलिसांचे चेकपोस्ट.
-८ अधिकारी, ४० अंमलदारांची ८ पथके फिरती गस्त घालतील.
-५ अधिकारी, २५ अंमलदारांचे ५ पथके ढाबे तपासतील. गुन्हे शाखेची २ पथकेही तपासणी करतील.
- १ अधिकारी, ५ अंमलदारांची दोन पथके वादग्रस्त पोस्टर तपासतील.
-नगर नाका, दौलताबाद टी पॉईंट, बायपास, शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन, केंब्रिज चौक, क्रांती चौक व कॅनॉट प्लेसला विशेष बंदोबस्त.
पहाटे ५ पर्यंत रेस्टॉरंट, बार
दरवर्षीप्रमाणे पहाटे ५ पर्यंत बार, रेस्टॉरंट, हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी असेल. वाइन शॉप रात्री १ पर्यंत सुरू राहतील.
पाच पथकांद्वारे गस्त
दि. ३१ डिसेंबरला शहरासह लगतच्या परिसरातील ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारूची विक्री, प्राशन केली जाते. यासाठी राज्य उत्पादन शुल्कची ५ भरारी पथके नियुक्त केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांनी सांगितले.