संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. परिणामी, मास्कचे महत्त्व कितीतरी पटीने वाढले आहे. अनेकजण एकावर एक असे दोन मास्क वापरताना दिसत आहेत. अशाप्रकारे डबल मास्क वापरण्यात कोणताही तोटा नाही, फायदाच आहे. पण मास्क कुठलाही वापरा, फक्त तो योग्य पद्धतीने वापरला पाहिजे. शिवाय आयसीयु बेड, रेमडेसिविर इंजेक्शन शोधण्याची वेळ ओढवण्यापेक्षा मास्कवर भर दिला, तर रुग्णालयात जाण्यापासून टाळता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडता येत आहे. घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर जाण्यास प्राधान्य दिले जात आहे. आधी सर्जिकल मास्क आणि त्यावर एन-९५ अथवा आधी कापडी मास्क, त्यावर रुमाल, अशाप्रकारे एकावर एक दोन मास्क वापरण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. मास्क वापरला जात आहे, परंतु मास्क वापरताना पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे मास्क लावलेला असतानाही कोरोनाची लागण कशी झाली, असा सवाल रुग्णांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे मास्क कितीही अधिक रकमेचा असला तरी, तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
------
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण - १,२६,१७६
बरे झालेले रुग्ण - १,१२,५४२
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ११,०७७
होम आयसोलेशनमधील रुग्ण - १५१०
---
मास्क कसा वापरावा
रुग्णालयात भरती होऊन खर्च करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीच्या मास्कसाठी खर्च केला पाहिजे. मास्क वापरताना, तो नाक आणि तोंड झाकले जाईल, अशा पद्धतीचा हवा. हनुवटीखालून, नाकाच्या भागातून अथवा गालाच्या बाजूने हवा आतमध्ये येता कामा नये. यासाठी मास्क पुरेसा घट्ट बांधला गेला पाहिजे. कापडी मास्क अथवा वापरता तो मास्क स्वच्छ धुतलेला असावा.
-----
मास्क वापरताना हे करू नका...
एकच मास्क न धुता अनेक दिवस वारंवार वापरू नये. बाहेरून घरी आल्यानंतर अनेक जण मास्कची घडी घालून खिशात ठेवतात आणि बाहेर पडताना पुन्हा तोच मास्क वापरतात. पण असे करू नये. घरी आल्यानंतर मास्क टाकून द्यावा अथवा धुण्यासाठी टाकावा. मास्क हनुवटीखाली, मानेखाली आणून परत लावणे टाळावे. मास्कच्या बाहेरील अथवा आतील भागाला स्पर्श टाळावा.
----
एकच मास्क वारंवार वापरू नये
एन-९५ मास्कद्वारे ९५ टक्के संरक्षण होत असल्याचा दावा आहे. इतर मास्कपासून किती संरक्षण होते, हे सांगणे अवघड आहे. वायसर फिल्टरेशन करणारे मास्क वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे. एकच मास्क वारंवार वापरता कामा नये. साधे कापडी मास्क वापरताना व्यक्ती शिंकल्यास, त्याचे ड्रॉपलेट बाहेर पडण्याचे प्रमाण निश्चितच कमी राहील.
- डाॅ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन
---
मास्क योग्य पद्धतीने वापरा
साधा कापडी मास्क, रुमाल वापरला तरी, त्याने बऱ्यापैकी संरक्षण मिळते. सर्जिकल मास्क आणि त्यावर एन-९५ मास्क वापरला, तर जास्त फायदा होतो. त्याचे काही नुकसान नाही. पण जोही मास्क वापरता, तो योग्य पद्धतीने वापरायला हवा. मास्कच्या बाहेरच्या भागाला हात लावू नये. मास्क कुठला वापरता यापेक्षा, तो कसा वापरता, याला अधिक महत्त्व द्यावे.
- डाॅ. अनंत कुलकर्णी, फिजिशियन