शिंदेसेनेचे खासदार, आमदार आम्हीच निवडून आणले; स्वबळावर महापालिका लढा, भाजपचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:45 IST2025-06-02T13:44:16+5:302025-06-02T13:45:05+5:30
येणाऱ्या महापालिका निवडणुका या भाजपने स्वबळावर लढाव्यात. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्यावर अन्याय होऊ नये

शिंदेसेनेचे खासदार, आमदार आम्हीच निवडून आणले; स्वबळावर महापालिका लढा, भाजपचा सूर
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचा खासदार, शहरासह ग्रामीणमधील शिंदेसेनेचे आमदार भाजपच्या कार्यकर्त्यांच्या, नेटवर्कच्या बळावर निवडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुका या भाजपने स्वबळावर लढाव्यात. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांना संधी मिळावी. भाजपचा महापौर महापालिकेत बसावा, असा सूर रविवारी नवनिर्वाचित शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या पदग्रहण समारंभात आळविण्यात आला. संघटनेतील गटबाजीवर देखील बोट ठेवण्यात आले. यावेळी बोराळकर यांच्या काळातील अनेक पदाधिकारी गैरहजर होते.
मावळते शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी समर्थन देत निश्चितपणे महापालिकेत भाजपचाच महापौर बसेल, असे आश्वासित केले. पक्षाच्या विभागीय कार्यालयात झालेल्या पदभार समारंभाप्रसंगी यावेळी आ. संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे, जालिंदर शेंडगे आदींची उपस्थिती होती.
बोराळकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. यामुळे या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचे फळ मिळावे, यासाठी निवडणुका स्वबळावर लढाव्यात व भाजपचा महापौर बसवावा. आ. केणेकर म्हणाले, पक्षाने संघटनेला बळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
दबावाला बळी पडू नका
शहराध्यक्षाला कसरत करून डोलारा सांभाळावा लागतो. दबावाला बळी पडू नका. बळी पडलात तर कामे करणे अवघड होते, असा शितोळेंना माझा सल्ला आहे. पाय ओढणारे अनेकजण आहेत. सोबत काम करणारे कमी आहेत. मला काही निवडणूक लढायची नाही. माझे कुणीही पंटर नव्हते, गटबाजीला मी थारा दिला नाही. ज्यांनी काम केले, त्यांना कामे देऊन सांभाळले. पक्षाला ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ कार्यकर्ते लागतात. संघटना आणि इव्हेंट असे जिल्हाप्रमुख पक्षाला असावेत.- शिरीष बोराळकर, माजी शहराध्यक्ष.
पूर्ण ताकदीनिशी भाजपचा महापौर होईल
महापालिका निवडणुकीनंतर भाजपचा महापौर पूर्ण ताकदीनिशी बसेल. शहराध्यक्षाला संघटनेसाठी काम करावे लागते. त्याचे वैयक्तिक काहीही काम नसते. नूतन शहराध्यक्षाच्या पाठीशी आम्ही सगळे राहू.
- अतुल सावे, ओबीसी कल्याणमंत्री
महापौर आमचाच होईल
शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नासह चांगल्या सुविधा देण्यासाठी चांगले नगरसेवक निवडून आणण्यासाठी संघटन बांधणी करण्याचा प्रयत्न असेल. पालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर बसेल. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन चालू.
- किशोर शितोळे, भाजप शहराध्यक्ष.