पाणीपुरवठ्यावरील संकटे कायम; वेळापत्रकासाठी महापालिकेची तारेवरची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:58 IST2022-05-27T19:58:16+5:302022-05-27T19:58:35+5:30
शहराची नवीन पाणीपुरवठा योजना व सातारा-देवळाईसाठीच्या ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘अमृत २’ योजनेसाठी पाठविला जाणार आहे.

पाणीपुरवठ्यावरील संकटे कायम; वेळापत्रकासाठी महापालिकेची तारेवरची कसरत
औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यावरील संकटे कायम आहेत. गुरुवारी रेल्वे स्टेशन रोडवर व्हॉल्व्हला गळती लागली, तर सायंकाळी टीव्ही सेंटर परिसरात जलवाहिनीचा टी पॉइंट फुटला.
टीव्ही सेंटर भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, शुक्रवारी या भागात पाणी दिले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख हेमंत कोल्हे यांनी सांगितले. शहरात ५ दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत असतानाच गुरुवारी रेल्वे स्टेशन रोडवर व्हॉल्वला लागलेली गळती बंद करण्यासाठी दुरुस्ती करावी लागली. गळती थांबविणे शक्य नसल्याने खोदकाम केलेल्या ठिकाणी भराव टाकला. गळती थांबविण्यासाठी पुन्हा खोदावे लागेल, असे कोल्हे यांनी सांगितले. या ठिकाणी दोन जलवाहिन्या असून, नेमक्या कोणत्या लाईनला गळती लागली, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, टीव्ही सेंटर भागात तीनशे ते दीडशे मि.मी.च्या जलवाहिनीला जोडणारा टी पॉइंट खराब झाल्याने दुरुस्ती केली. पण चाचणी घेताना टी पॉईंट पुन्हा फुटला. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
अमृत-२ योजनेसाठी प्रस्तावाची तयारी
शहराची नवीन पाणीपुरवठा योजना व सातारा-देवळाईसाठीच्या ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘अमृत २’ योजनेसाठी पाठविला जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू आहे. ‘अमृत-२’मध्ये निधी मिळविण्यासाठी शहराला स्वच्छ सर्वेक्षणातील रँकिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर निधी उपलब्ध होईल, अशी अट शासनाने टाकली आहे. शासनाने १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून सध्या १३०८ कोटींच्या निविदेअंतर्गत काम सुरू आहे.
पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा
शहरातील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रशासकांनी प्रत्येक प्रभागासाठी एक पालक अधिकारी नियुक्त केला आहे. अधिकारी पथकामुळेच सिडको एन-५ व एन-७ जलकुंभावरील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. सिडकोतील १४ वॉर्डांत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या पथकाने समाधानकारक काम केल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. दरम्यान, नारेगाव व ब्रिजवाडी येथील वापरात नसलेल्या पाण्याच्या दोन्ही टाक्या जीर्ण झाल्याने केव्हाही कोसळू शकतात. तसेच पावसाळा तोंडावर असल्यामुळे या टाक्या पाडण्याच्या सूचना पथकाने केल्या आहेत.