पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:38 IST2025-06-28T17:33:34+5:302025-06-28T17:38:49+5:30
नशेखोराची टँकर चालकास मारहाण, महिलांवरही धावला

पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
छत्रपती संभाजीनगर : जय भवानीनगर (गल्ली क्र. ११) येथे शुक्रवारी सायंकाळी एक गंभीर व धक्कादायक घटना घडली. महापालिकेच्या पाण्याच्या टँकरचे थोडेसे पाणी अंगावर उडाले, या क्षुल्लक कारणावरून एका नशेखोर तरुणाने टँकर चालकास बेदम मारहाण केली. यानंतर त्याने कोयता काढून परिसरात दहशत माजवली.
घटनेदरम्यान टँकर चालक राजू काळेने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी अधिकच आक्रमक झाला. त्याने शिविगाळ करत चालकावर हल्ला चढवला. यावेळी काही महिला पुढे येत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण या महिलांवरही आरोपीने धाव घेत धमकी दिली. त्याचा एक साथीदारही नागरिकांना धमकावत होता. महिलांनी वेळीच मागे हटल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, यामुळे टँकर चालकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर सकाळी काही नागरिकांनी जलकुंभावर जात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. आरोपिस ताब्यात घेतल्यानंतर टँकर पुरवठा सुरळीत करण्यात आला.
ठाकरेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याचे धाडस
कोयता हवेत फिरवत दहशत माजवणारा, महिलांवर धावून जाणाऱ्या तरुणाची माहिती ठाकरेसेनेच्या सुकन्या भोसले यांना मिळाली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यामध्येच त्यांना कोयता घेतलेला तरुण आढळला. त्यांनी लागलीच त्याला पकडून त्याच्या हातातून कोयता फेकून दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.