छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी बोंबाबोंब; नागरिकांकडून हंडा मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:53 IST2025-02-04T15:52:26+5:302025-02-04T15:53:15+5:30

२०० कोटी खर्च करून स्वतंत्र ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली, तरीही शहराला किंचित प्रमाणात फायदा झाला नाही.

Water scarcity in Chhatrapati Sambhajinagar; Citizens warn of pot march | छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी बोंबाबोंब; नागरिकांकडून हंडा मोर्चाचा इशारा

छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी बोंबाबोंब; नागरिकांकडून हंडा मोर्चाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याची चाहूल लागताच, शहरात पुन्हा एकदा पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. काही वसाहतींचे पाणी आपोआप कमी झाल्याने नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. भीमनगर भावसिंगपुरा, सिडको-हडकोतील काही वॉर्ड, भडकलगेट-टाउन हॉल, रशीदपुरा इ. भागातील नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यंदा उन्हाळ्यात शहरवासीयांना मुबलक पाणी मिळेल, असा दावा केला होता. मात्र, फेब्रुवारी सुरू झाला, तरी अद्याप शहराला वाढीव पाणी मिळालेले नाही. २०० कोटी खर्च करून स्वतंत्र ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली, तरीही शहराला किंचित प्रमाणात फायदा झाला नाही. यंदाही नागरिकांना पाणी-पाणी करावे लागेल, अशी शक्यता आहे.

शहराला उन्हाळ्यात रोज २०० एमएलडी पाणी लागते. सध्या १३० एमएलडी पाणी येत आहे. काही वसाहतींना पाचव्या तर काहींना आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. अनेक वसाहतींना पाणीच मिळत नाही. तक्रारी केल्या, तर त्याची फारशी दखलही घेतली जात नाही.

या वसाहतींच्या तक्रारी
१) भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील कानिफनाथ कॉलनी गल्ली क्रमांक १ ते ३ मध्ये काही दिवसांपासून पाणीच येत नाही. येथील जलवाहिनीवर हजारो अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. या भागातील नवीन जलवाहिनीतून ड्रेनेजचे पाणी येत आहे. पाणीप्रश्न न सोडविल्यास मनपावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राहुल भालेराव, करुणा गौतम भामरे, नंदिनी मेश्राम, अप्पा बोरसे आदींनी दिला.
२) शताब्दीनगर-रशीदपुरा भागातही नळांना तीन आठवड्यांपासून पाणी येत नाही. पूर्वी थोडे-फार येणारे पाणीही आता बंद झाले. नागरिकांनी वॉर्ड अभियंता कार्यालयाकडे तक्रारी केल्या. त्याची दखलही घेतली नाही, असा आरोप इस्माईल नाना, अय्युब खान, रफीक अहेमद आदींनी केला.
३) भडकलगेट- टाउन हॉल भागात तीन ते चार आठवड्यांपासून पाणी का येत नाही, याचा शोधही पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी घेण्यास तयार नाहीत. या आठवड्यात पाणीप्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला.

तपासणी सुरू
पाणी का येत नाही, कुठे जलवाहिनी चोकअप आहे का, याचा शोध संबधित कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येतोय. दोन ते तीन दिवसांत तक्रारींच्या अनुषंगाने प्रश्न सुटेल.
- के.एम. फालक, कार्यकारी अभियंता, मनपा.

Web Title: Water scarcity in Chhatrapati Sambhajinagar; Citizens warn of pot march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.