छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा खेळ;९ दिवसांपासून बंद जलवाहिनी सुरू अन् ११ तासानंतर फुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:10 IST2025-04-02T15:05:12+5:302025-04-02T15:10:02+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा खेळ, २० एमएलडी पाण्याचा तुटवडा

छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा खेळ;९ दिवसांपासून बंद जलवाहिनी सुरू अन् ११ तासानंतर फुटली
छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा, अशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (मजीप्रा) अजिबात इच्छा नाही. त्यांनीच टाकलेली ९०० मिमी. व्यासाची जलवाहिनी मागील नऊ दिवसांपासून बंद होती. सोमवारी रात्री ११:०० वाजता ती कशीबशी सुरू झाली. मंगळवारी सकाळी ११:०० वाजता फारोळा फाट्याजवळच ती पुन्हा फुटली. त्यामुळे जलवाहिनीतून येणारे २० एमएलडी अतिरिक्त पाणी बंद झाले. विशेष बाब म्हणजे मजीप्राने दुरुस्तीचे कामही सुरू केले नाही.
शहराला उन्हाळ्यात अतिरिक्त ७५ एमएलडी पाणी मिळावे, यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकली. जलवाहिनीतून फक्त २० एमएलडी पाणी काही महिन्यांपासून येत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याला यामुळे थोडासा आधार मिळतो. २२ मार्च रोजी फारोळा फाटा येथे ९०० मिमी. व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूलाच २५०० मिमी. व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामामुळे ९०० मिमी. जलवाहिनीचे काही पाइप निखळले होते. दुरुस्तीसाठी मजीप्राने तब्बल नऊ दिवस लावले. शहरात भयंकर पाणीप्रश्न असताना जलवाहिनी दुरुस्त करून दिली नाही. मनपाच्या प्रचंड रेट्यानंतर सोमवारी रात्री ११:०० वाजता जलवाहिनी सुरू झाली. सकाळी ११:०० वाजता ती फारोळा फाट्यापासून १०० मीटर अंतरावर परत २५०० मिमी. व्यासाचा पाइप टाकताना फुटली.
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा
२५०० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकताना ९०० मिमी. व्यासाच्या जलवाहिनीला सिमेंटचा सहारा दिलेला होता. हा टेकू जेसीबीच्या मदतीने काढण्यात आला. त्यामुळे जलवाहिनीचे जॉइंट निखळले. कंत्राटदाराचा हा निष्काळजीपणा असल्याचा आरोप मनपाने केला.
पाणीपुरवठा विस्कळीत करू नका
मजीप्रा शहराला वाढीव पाणी देण्याचे आश्वासन देऊनही पाणी देऊ शकले नाही. शहराला सध्या ७००, ९०० आणि १,२०० मिमी. व्यासाच्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा होत आहे. नवीन २५०० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकताना पाणीपुरवठा सुरू असलेल्या जलवाहिन्यांना तरी बंद पाडू नका, अशी विनंती मनपाने केली आहे.