विना मोटार तिसऱ्या मजल्यावर पाणी, टेस्टिंग यशस्वी; छत्रपती संभाजीनगरकरांना मोठी गुड न्यूज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:34 IST2025-10-18T14:33:22+5:302025-10-18T14:34:52+5:30
नवीन वर्षात शहरवासीयांना दररोज पाणी मिळेल, यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) आणि महापालिका प्रयत्न करीत आहे.

विना मोटार तिसऱ्या मजल्यावर पाणी, टेस्टिंग यशस्वी; छत्रपती संभाजीनगरकरांना मोठी गुड न्यूज!
छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिन्यांची हायड्रो टेस्टींग सुरू करण्यात आली असून, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता नक्षत्रवाडी ते शिवाजीनगरकडे जाणाऱ्या १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची टेस्ट देवळाई चौकात करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे देण्यात आली. तीन मजल्यापर्यंत नागरिकांना विद्युत मोटार न लावता प्रेशरने पाणी मिळू शकते हे या टेस्टींगवरून निदर्शनास आले.
नवीन वर्षात शहरवासीयांना दररोज पाणी मिळेल, यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) आणि महापालिका प्रयत्न करीत आहे. पुढील तीन महिन्यात पहिल्या टप्प्यातील सर्व कामे कशी पूर्ण करता येतील यावर भर दिला जातोय. शुक्रवारी देवळाई चौकात हायड्रो टेस्टींग घेतली. त्यासाठी जलवाहिनीत ५० लाख लिटर पाणी सोडण्यात आले होते. देवळाई चौकात पाण्याचे प्रेशर तपासण्यात आले. किमान ३ मजल्यापर्यंत पाणी जाईल, एवढे प्रेशर जलवाहिनीतील पाण्याला होते.
ही टेस्टींग पाहण्यासाठी आसपासच्या नागरिकांनीही अलोट गर्दी केली होती. दीड किलोमिटर अंतरात पाणी सोडून ही टेस्ट करण्यात आली. या पद्धतीत जलवाहिनीचे तोंड दोन्ही बाजूनी बंद करून पाण्याचे प्रेशर वाढविण्यात येते. दिडपट प्रेशर वाढविल्यानंतर जलवाहिनीला कुठे लिकेज तर नाही, हे सुद्धा तपासले जाते. नक्षत्रवाडी येथील उंच डोंगरावरून भविष्यात गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी येईल. नक्षत्रवाडीहून येणारी जलवाहिनी सातारा-देवळाई, शिवाजीनगर, सिडको-हडको भागात जाईल. शहरातही विना मोटारीचे पाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल, यादृष्टीने मजीप्रा, जीव्हीपीआर कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक नळाला मिटर बसविले तरच हा प्रयोग अधिक यशस्वी होवू शकेल.
काम शेवटच्या टप्प्यात
जायकवाडी ते नक्षत्रवाडी ३८ किमी मुख्य जलवाहनी टाकण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. २१३ मीटर जलवाहिनी जोडण्याचे काम बाकी आहे. दिवाळीनंतर सहा दिवसाचा शटडाऊन घेण्यात येईल. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे हे काम थांबले होते. टाकळी फाटा येथे हे काम आहे.