छत्रपती संभाजीनगरवर जलसंकट; तब्बल १२ तास जायकवाडीतून पाणीपुरवठा होता बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:39 IST2025-03-26T18:38:38+5:302025-03-26T18:39:13+5:30
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात वारंवार जलवाहिनी फुटण्यासह तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे.

छत्रपती संभाजीनगरवर जलसंकट; तब्बल १२ तास जायकवाडीतून पाणीपुरवठा होता बंद
छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या १२०० मिमीच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह सोमवारी रात्री ८:३० वाजता ट्रकचा धक्का लागल्याने लिकेज झाला. प्रशासनाने तत्काळ मध्यरात्री ११ वाजेपासून दुरुस्तीचे काम हाती घेऊन मंगळवारी सकाळी ११ वाजता काम पूर्ण केले. यासाठी तब्बल १२ तास शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे शहरात जलसंकट निर्माण झाले.
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात वारंवार जलवाहिनी फुटण्यासह तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. चार दिवसांपासून नवीन ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद आहे. त्यामुळे दररोज किमान २० एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच सोमवारी रात्री ८:३० वाजता फारोळा येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीच्या सिमेंट मिक्सरने मनपाच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला जोरदार धडक दिली. त्यामुळे व्हॉल्व्हमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. पाणी शेजारील एका कंपनीत शिरल्याने एक प्लांट बंद झाला. परिस्थिती लक्षात घेऊन मनपाने त्वरित जायकवाडी येथून पाण्याचा उपसा बंद केला. उपअभियंता किरण धांडे, बाविस्कर यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. १२ तासांनंतर जायकवाडी येथील पहिला उपसा पंप सुरू केला. त्यानंतर शहरात पाणी येण्यासाठी सायंकाळ झाली. शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक अगोदरच कोलमडलेले असताना पुन्हा एक दिवस उशिराने शहराला पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
एअर व्हॉल्व्हच्या कामामुळे शहराची मुख्य जलवाहिनी १२ तास बंद ठेवावी लागली. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, ज्या वसाहतींना आठ दिवसांपूर्वी पाणी मिळाले होते, त्या वसाहतींना पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.
-के. एम. फालक, कार्यकारी अभियंता.