स्वेच्छा मरणाला परवानगी द्या; एसटी कर्मचार्यांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:21 IST2018-03-22T18:19:19+5:302018-03-22T18:21:01+5:30
राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्या किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे साकडे कन्नड आगारातील ११२ कर्मचार्यांनी व सिल्लोडमधील एका कर्मचार्याने मुख्यमंत्र्यांना घातले आहे.

स्वेच्छा मरणाला परवानगी द्या; एसटी कर्मचार्यांचे साकडे
औरंगाबाद : मागण्यांसंदर्भात वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एक तर एस. टी. महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्या किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे साकडे कन्नड आगारातील ११२ कर्मचार्यांनी व सिल्लोडमधील एका कर्मचार्याने मुख्यमंत्र्यांना घातले आहे.
कन्नड येथील वाहतूक नियंत्रक संतोष बैरागी, चालक देवीदास शिरसे व वाहक गणेश खंडागळे यांनी सांगितले की, एस. टी. महामंडळात मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर प्रकारे होणार्या त्रासामुळे काही कर्मचार्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही.
आता मानसिक व सरकारकडून होणार्या आर्थिक पिळवणुकीला वैतागल्याने एकतर एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारच्या कर्मचार्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देऊन आर्थिक, मानसिक त्रासातून मुक्त करून जीवदान द्यावे नसता स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
सिल्लोडच्या कारकूनाने दिले निवेदन
दरम्यान, सिल्लोड आगारातील कारकुनानेही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. सोमेश तेजराव सपकाळ (२५) असे या कारकुनाचे नाव आहे. एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीनीकरण करावे, सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन श्रेणी द्यावी, आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्ती द्यावी, आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर किमान मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे लेखी पत्र या कर्मचार्याने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. सदर कर्मचारी हा अनुकंपावर लागलेला आहे. घरची परिस्थिती बिकट आहे.