अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेतील विशाल एडकेला जामीन, पण जिल्हाबंदीची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:14 IST2025-05-24T12:14:26+5:302025-05-24T12:14:46+5:30

जामीन मंजूर करताना न्यायालयाने ठेवली अट, दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी

Vishal Edke, arrested for threatening officials, granted bail, but subject to district ban | अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेतील विशाल एडकेला जामीन, पण जिल्हाबंदीची अट

अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेतील विशाल एडकेला जामीन, पण जिल्हाबंदीची अट

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम करून वर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावणारा अंश इन्फोटेक कंपनीचा उपमहाव्यवस्थापक विशाल एडके याला पोलिसांनी ७ मे रोजी अटक केली होती. मंगळवारी न्यायालयाने त्याचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत दोषाराेपपत्र दाखल होईपर्यंत जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट घातली आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेदरम्यान रोड रिस्टोरेशन व पेव्हर ब्लॉकच्या कामाच्या दर्जाच्या मोजमापात मोठी तफावत आढळल्याने एडकेचे काम थांबविण्यात आले होते. जीव्हीपीआर कंपनीतर्फे त्याला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमले होते. हायड्रॉलिक परीक्षणाच्या आधी पाइपलाइन बुजविल्याचे समोर आल्याने प्राधिकरणाने काम थांबवले. त्या रागातून एडकेने स्थानिकांना हाताशी धरून प्राधिकरणाविरोधात तक्रारसत्र सुरू केले. मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांना खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावरून त्याच्यावर ५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

७ मे रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी एडकेला अटक केली. १४ मेपर्यंत तो पोलिस कोठडीत होता. त्यानंतर त्याने ॲड. गोपाल पांडे, व्ही. डी. सपकाळ यांच्यामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने एडकेचा जामीन सशर्त मंजूर केला. शासनाच्या वतीने ॲड. एस. व्ही. मुंडवाडकर यांनी बाजू मांडली.

या अटी-शर्ती
न्यायालयाने एडकेला दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. तपास अधिकाऱ्याने बोलावल्यास हजर राहावे, राहत असलेल्या पत्त्याविषयी पोलिसांना कळवून दर रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत स्थानिक पोलिस ठाण्यात हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Vishal Edke, arrested for threatening officials, granted bail, but subject to district ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.