विराट जनआक्रोश मोर्चाने केली माजी खासदाराच्या अटकेची मागणी; शहरात घोंगावले निळे वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:27 IST2025-06-24T19:26:41+5:302025-06-24T19:27:24+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचार विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहरात घोंगावले निळे वादळ

Virat Jan Aakrosh Morcha demands arrest of former MP; Blue storm erupts in the city | विराट जनआक्रोश मोर्चाने केली माजी खासदाराच्या अटकेची मागणी; शहरात घोंगावले निळे वादळ

विराट जनआक्रोश मोर्चाने केली माजी खासदाराच्या अटकेची मागणी; शहरात घोंगावले निळे वादळ

छत्रपती संभाजीनगर : ‘अटक करा, अटक करा, जातीयवादी जलिलांना अटक करा, जो हमसे टकरायेगा, मिट्टी में मिल जायेगा,’ अशा गगनभेदी घोषणांनी सोमवारी शहर दुमदुमले. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ११ जून रोजी पत्रकार परिषदेत अपशब्दाचा वापर करून बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर क्रांती चौक, बेगमपुरा, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत; परंतु जलील यांना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने सोमवारी विराट असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास रिपाइं (आठवले)चे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दुपारी मोर्चास प्रारंभ झाला. सिल्लेखाना, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा आणि मिलकॉर्नर मार्गे मोर्चाचा समारोप भडकल गेट येथील जाहीर सभेने झाला.

या मोर्चात पुरुष व तरुणांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी लक्षणीय होती. हाती निळे ध्वज घेऊन मुलाबाळांसह महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्या आक्रमकपणे घोषणाही देत होत्या. त्यामुळे मोर्चा मार्गावर दुतर्फा बघ्यांची गर्दी होती. या मोर्चाच्या अग्रभागी असलेले नेते मंडळी पैठणगेटला तर शेवटचे टोक क्रांती चौकातच होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोर्चेकरी चालत असल्यामुळे पोलिसांनी हे रस्ते वाहतुकीस पूर्णपणे बंद केले होते.

जलील फक्त मागासवर्गीयांच्या विरोधी
भडकलगेट येथे सभेत बोलताना प्रमुख नेत्यांनी जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले. जलील मागासवर्गीयांच्या योजना बंद करायला निघाले आहेत. रमाई घरकुल योजना यांना बंद करायची आहे. यांना मोठ्या लोकांचा भ्रष्टाचार दिसत नाही. हा मोर्चा मुस्लिम विरोधी नसून पैसेवाल्यांशी मॅनेज होणाऱ्या सुपारीबाज नेत्याविरुद्ध असल्याचा सूर बाबुराव कदम, अरुण बोर्डे, जालिंदर शेंडगे, संजय ठोकळ, ॲड. विजय जोंधळे, अमित भुईगड, विनोद बनकर, दीपक निकाळजे, सतीश पट्टेकर, मिलिंद शेळके, बाळासाहेब सानप यांच्या भाषणातून उमटला.

हा शक्ती कपूर पण समजतो शाहरुख खान
अफसर खान यावेळी म्हणाले की, हा आहे शक्ती कपूर पण स्वत:ला समजतो शाहरुख खान. यांची आतापर्यंतची सर्व आंदोलने सेटलमेंटची आहेत. जेवढी आंदोलने हाती घेतली सर्व धंदे आता अधिक वाढले आहेत. दलित व मुस्लिमांची मते घेऊन संसदेत गेलेल्या जलिलांनी निधी कोठे वापरला त्याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विजय मगरे, बाबा तायडे, सचिन बोर्डे, सुनील सोनवणे, किशोर थोरात, आनंद लोखंडे, अरविंद अवसरमोल, रवी तायडे, माजी सरपंच अंजन साळवे आदींसह शहरातील विविध क्षेत्रांतून आलेल्या नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लक्झरी बस अन् ट्रकही...
शहरातील विविध वसाहतीमधून महिला मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाल्या. यावेळेस महिला थेट अनेक लक्झरी बसने क्रांती चौकात आल्या. काही महिला ट्रकने तर काही ट्रॅक्सनी पोहचल्या. त्यांना बाटलीबंद पिण्याचे पाणी देण्यात आले.

शेकडो पोस्टर्स व झेंडे
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेकडो पोस्टर्स व निळे आणि पिवळे झेंडे या महिलांच्या हाती होते. शिवाय जलील यांच्या विरोधातील पोस्टर्सची संख्याही लक्षणीय होती.

मोर्चातही डीजे वाहन
मोर्चात अग्रभागी डीजेचे वाहन होते. त्या वाहनावर उभे राहून अरुण बोर्डे घोषणाबाजी करत होते. मोर्चात पहिल्यांदाच डीजे वापरल्याची चर्चाही रंगत होती.

Web Title: Virat Jan Aakrosh Morcha demands arrest of former MP; Blue storm erupts in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.