छत्रपती संभाजीनगरात मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, शोधावा लागणार पर्यायी प्रभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:35 IST2025-11-12T19:33:43+5:302025-11-12T19:35:18+5:30
काही दिग्गज माजी नगरसेवकांना आरक्षणाचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येतेय; महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट

छत्रपती संभाजीनगरात मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, शोधावा लागणार पर्यायी प्रभाग
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, मंगळवारी ११५ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात काही दिग्गज माजी नगरसेवकांना आरक्षणाचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येतेय. त्यांना महापालिका निवडणूक लढविण्यासाठी पर्यायी प्रभाग शोधावा लागणार, हे निश्चित. यामध्ये उद्धव सेनेतून शिंदे सेनेत गेलेले माजी महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, भाजपमध्ये प्रवेश केलेले कैलास गायकवाड, विधानसभा निवडणूक लढलेले राजू शिंदे यांना पर्यायी प्रभाग शोधावा लागणार आहे.
घोडेले यांचा नक्षत्रवाडी प्रभाग ३ सदस्यांचा आहे. एससी (पुरुष), ओबीसी (महिला) आणि सर्वसाधारण महिला अशी परिस्थिती आरक्षणानंतर झाली. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून त्यांच्या पत्नी अनिता घोडेले निवडणूक लढवू शकतात. घोडेले यांना सातारा-देवळाई भागात पर्याय शोधावा लागेल. दिलीप थोरात प्रभाग क्रमांक २१ मधून इच्छुक आहेत. तेथे तीन जागा आरक्षित झाल्या. एक खुल्या प्रवर्गाचा पर्याय शिल्लक आहे. या ठिकाणी तिकीट मागणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे थोरात यांचा निभाव येथे लागेल का, हा मोठा प्रश्न आहे. उद्धव सेनेकडून विधानसभा निवडणूक लढलेले राजू शिंदे यांनाही पर्यायी प्रभाग शोधावा लागणार असल्याची स्थिती आहे. ते नेहमी एन-१ भागातून निवडून येत असत. हा प्रभाग क्रमांक १० मधील भाग आहे. या प्रभागात ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि दोन जागा सर्वसाधारण आहेत. त्यामुळे शिंदे यांना सर्वसाधारणमध्ये लढावे लागेल. त्यांच्यासाठी एससी प्रवर्गातून आरक्षण पडलेच नाही. प्रभाग क्रमांक २७ मधून कैलास गायकवाड इच्छुक होते. या ठिकाणी एससी महिला असे आरक्षण पडले. त्यामुळे त्यांचीही थोडी गोची झाली. अरुण बोर्डे यांना स्वत: मनपात येण्याची इच्छा होती. त्यांच्या प्रभाग २८ मध्ये महिला एससी आरक्षण पडले. त्यामुळे परत एकदा पत्नीला उभे करावे लागेल.
निवडणूक लढणार नाही; पण...
माजी महापौर बापू घडामोडे यांनी स्वत: निवडणूक लढण्यास नकार दिला. कुटुंबातूनही कोणी फारसे उत्सुक नाही. पक्षाने म्हटले तर बघू, अशा भूमिकेत ते आहेत. एमआयएमचे माजी गटनेता तथा दोनदा विधानसभा लढलेले नासेर सिद्दिकीही स्वत: न लढण्याच्या मूडमध्ये आहेत. कारण त्यांचा प्रभाग १५ किमी अंतरात विखुरला आहे. समोर वंचितचे अफसर खान राहतील. त्यामुळे त्यांनीही नकारघंटा वाजविली. पक्षाने म्हटले तर जरूर लढू, असे म्हणायला ते विसरले नाहीत.