'पाचोळा'कार काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:03 IST2025-02-11T10:03:27+5:302025-02-11T10:03:27+5:30
Veteran writer r r borade News: ग्रामीण कथाकार, कांदबरीकार रा.रं. बोराडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

'पाचोळा'कार काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन
R R Borade News: मराठी ग्रामीण साहित्यात विपूल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं. बोराडे यांचे आज निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. एमजीएम रुग्णालयात बोराडे यांनी अखेरचा श्वास घेतला. पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना 'पाचोळा'कार म्हणून साहित्यिक वर्तुळात ओळख मिळाली होती.
रा.रं. बोराडे यांच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रावसाहेब रंगराव बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी झाला होता. लातूर जिल्ह्यातील 'काटगाव' सारख्या छोट्याश्या गावात त्यांचा एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण पुढील शिक्षणासाठी गावं सोडले. माढा, बार्शी, सोलापूर, औरंगाबाद अशा शहरातून शिक्षण पूर्ण केले.
नोकरीच्या निमिताने वास्तव्य नागरी भागात होते; तरी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाने व तिथल्या ऋतूचक्राने घडविलेला मन:पिंड कायम राहिला.१९५७ साली आपली पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरू झाला होता.
त्यांच्या १९६२ साली आलेल्या ‘पेरणी’ ते ‘ताळमेळ’, ‘मळणी’, ‘वाळवण’, ‘राखण’, ‘गोधळ’, ‘माळरान’, ‘बोळवण’, ’वरात’, ‘फजितवाडा’, ‘खोळंबा’, ‘बुरुज’, ‘नातीगोती’, ‘हेलकावे’, ‘कणसं आणि कडबा’ यासारख्या कथासंग्रहानी मराठवाडी कष्टकऱ्यांच्या दु:खाला भाषिक आविष्कारातून वाचा फोडली.
मराठवाड्यातील माणसं, स्त्री शोषण, कौटुंबिक ताणतणाव, गरिबी, दुष्काळ, शेती, निसर्ग, देव, दैवते, श्रद्धा-अंधश्रद्धा, ग्रामीण परंपरा, नातीगोती आणि त्यातील राजकारण, माणसांचं बेरकीपण या विषयांभोवती त्यांनी लिखाण करत मराठी ग्रामीण साहित्याला समृद्ध करण्याचे काम केले.