अपघातानंतर वाहनाला आग; कॅबिनमध्ये अडकून चालकाचा कोसळा, दुसऱ्याचा रूग्णालयात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:37 IST2025-02-10T12:36:53+5:302025-02-10T12:37:27+5:30

खुलताबाद तालुक्यातील घटना; एक जण गंभीर जखमी

Vehicle catches fire after accident; Driver trapped in cabin burn alive, another person dies in hospital after being burnt | अपघातानंतर वाहनाला आग; कॅबिनमध्ये अडकून चालकाचा कोसळा, दुसऱ्याचा रूग्णालयात मृत्यू

अपघातानंतर वाहनाला आग; कॅबिनमध्ये अडकून चालकाचा कोसळा, दुसऱ्याचा रूग्णालयात मृत्यू

गल्लेबोरगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) : उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला छोटा हत्ती वाहन धडकून भीषण अपघात झाला. यात आग लागून छोटा हत्तीमधील चालकाचा जागेवरच कोळसा झाला असून, दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. अपघाताची ही घटना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गल्लेबोरगाव (ता.खुलताबाद) नजीक रविवारी (दि.९) सकाळी ५:४६ वाजता घडली. विनायक जालिंदर पाटील (वय ५१, रा.शिराठोण, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली) व दादासाहेब बाजीराव देशमुख (वय ३५, रा.तासगाव, जि. सांगली) अशी मयतांची नावे आहेत, तर सलीम मुलानी (वय ३४, रा. तासगाव) हे जखमी आहेत.

सांगली जिल्ह्यातील तासगांव येथून मयत विनायक पाटील, दादासाहेब देशमुख आणि सलीम मुलानी हे तिघे छोटा हत्ती वाहन (क्र.एमएच. ०४, एचडी. ३०४९) घेऊन मंडप डेकोरेशनचे सामान आणण्यासाठी इंदौर येथे निघाले होते. दरम्यान, महामार्गावरील गल्लेबोरगाव येथील पेट्रोल पंपाजवळ शेणखताची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीचे चाक पंक्चर झाल्याने ते रस्त्याच्या कडेला उभे होते. या ट्रॉलीला छोटा हत्ती वाहनाने जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, छोटा हत्तीच्या केबिनचा चक्काचूर होऊन त्यात चालक विनायक पाटील व दादासाहेब देशमुख हे दोघेही फसले. त्यातच वाहनाने अचानक पेट घेतला. यावेळी पाठीमागे बसलेले जखमी सलीम मुलानी हे ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यासाठी धावले. यात देशमुख यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, चालक पाटील यांचा जागेवरच कोळसा झाला.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेत, ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचाराच्या दरम्यान पाय भाजलेले देशमुख यांचा मृत्यू झाला, तर मुलानी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद खुलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली.

Web Title: Vehicle catches fire after accident; Driver trapped in cabin burn alive, another person dies in hospital after being burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.