हत्येनंतर पैठणगेट परिसरात दोन वेळा तोडफोड, दगडफेक; गुन्हा दाखल, दंगा काबू पथक तैनात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:22 IST2025-11-13T12:20:50+5:302025-11-13T12:22:44+5:30
हल्लेखोरांच्या घरासह पैठणगेट परिसरात दंगा काबू पथक कायम

हत्येनंतर पैठणगेट परिसरात दोन वेळा तोडफोड, दगडफेक; गुन्हा दाखल, दंगा काबू पथक तैनात!
छत्रपती संभाजीनगर : पैठण गेट येथील निर्घृण खुनाच्या घटनेनंतर रात्रीतून तसेच अंत्यसंस्कारानंतर दगडफेक करून तोडफोड प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. हा प्रकार करणाऱ्या जवळपास २० ते २५ जणांची ओळख पटवून कठोर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
१० नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वाजता पैठण गेट परिसरातील एस. एस. मोबाइल दुकानासमोर उभे राहून एकटक पाहिल्याच्या कारणावरून इम्रान अकबर कुरेशी (३३, रा. सिल्लेखाना) यांचा क्रूर खून करण्यात आला. यात हल्लेखोर परवेज शेखसह त्याला मदत करणाऱ्या शेख खय्युम शरीफ शेख, शेख सलीम शेख शरीफ व शेख फैजल शेख नजीम यांना गुन्हे शाखेने पहाटेपर्यंत अटक केली. सध्या त्यांची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. न्यायालयाने या सर्वांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून परवेजकडे शस्त्र कुठून आले, त्याला ते कोणी आणून दिले, याचा शोध सुरू आहे.
बंदोबस्त कायम, जमावावर गुन्हा दाखल
दरम्यान, इम्रान यांच्या हत्येनंतर अज्ञात जमावाने रात्रीतून आरोपी राहत असलेल्या परिसरात दगडफेक केली. दुचाकी, चारचाकींची तोडफोड करत परिसरातील रहिवाशांना धमकावले. मंगळवारी इम्रान यांच्या पार्थिवावर दफनविधी झाल्यानंतर अज्ञातांनी दुपारी ४ वाजता पैठण गेट परिसरात पुन्हा दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी स्वत: फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपींच्या घरासह पैठण गेट परिसर, सब्जीमंडी परिसरात बुधवारी देखील बंदोबस्त कायम होता.