कृत्रिम पावसाचा प्रयोग; प्रशासन अजूनही अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:11 IST2018-07-14T00:09:24+5:302018-07-14T00:11:53+5:30
सोलापूरमधून कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू झाला असून, त्याबाबत मराठवाडा विभागीय प्रशासनाला काहीही माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत कमी पाऊस झाला असून, इकडेही कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची गरज निर्माण झाली असताना कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यातील काही भागात सुरू करण्यात आल्याची माहितीदेखील मराठवाड्यातील प्रशासनाला नसल्यामुळे प्रशासकीय कारभार वेंधळेपणाने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयोग; प्रशासन अजूनही अंधारात
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सोलापूरमधून कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू झाला असून, त्याबाबत मराठवाडा विभागीय प्रशासनाला काहीही माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत कमी पाऊस झाला असून, इकडेही कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची गरज निर्माण झाली असताना कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यातील काही भागात सुरू करण्यात आल्याची माहितीदेखील मराठवाड्यातील प्रशासनाला नसल्यामुळे प्रशासकीय कारभार वेंधळेपणाने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वापरण्यात येणारे विमान शुक्रवारी रात्री चिकलठाणा विमानतळावर उतरले.
जून २०१५ ते आॅक्टोबर २०१५ या काळात मराठवाड्यात १०० तासांवर १०० तास मोफत या तत्त्वावर २७ कोटी रुपये खर्चातून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. विभागाचे पर्जन्यमान ७७९ मि.मी.च्या आसपास असताना त्या प्रयोगातून ९०० मि.मी. पाऊस पडल्याचा दावा करून तो प्रयोग गुंडाळण्यात आला. ज्या कंपनीने मराठवाड्यात प्रयोग केला होता. तीच कंपनी विमान व इतर लवाजम्यासह सोलापुरातून कृत्रिम प्रयोगासाठी सरसावली आहे.
केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग ३ जुलैपासून सुरू झाला आहे. २५० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्यछायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल, असा दावा केला जात असून, सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविले आहे.
प्रयोगासाठी वापरण्यात येणारी स्फोटके कुठे ठेवली आहेत, सोलापूर परिसरात प्रयोग केल्यानंतर विमान औरंगाबादेत थांबल्यानंतर उड्डाण घेताना मराठवाड्यातही सिल्व्हर कोटेड सिलिंडर हवेत सोडणार की, फक्त उड्डाण घेणार, यासारखी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले, असा काही प्रयोग सुरू झाला आहे, याची काहीही माहिती विभागीय प्रशासनाकडे अद्याप नाही. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्याबाबत शुक्रवारी आढावा घेतला आहे. प्रयोगासाठी वापरण्यात येणाऱ्या विमानाच्या लॅण्डिंगसाठी विमानतळ प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली असल्याच्या विषयावर डॉ. भापकर म्हणाले की, याबाबत काहीही माहिती नाही. या सगळ्या प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल.
स्फोटकांच्या साठ्यासाठी विचारणा
जिल्हा प्रशासनाने २०१५ साली नायब तहसीलदार बी.डी. म्हस्के यांच्या नावे सिल्व्हर कोटेड सिलिंडर या स्फोटकांचा साठा विमानतळ परिसरातील जुन्या इमारतीत ठेवण्यासाठी परवानगी काढली होती. गेल्या महिन्यात त्याच परवान्यावर स्फोटकांचा साठा औरंगाबादेत करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून जिल्हा प्रशासनाला विचारणा करण्यात आली होती. त्या परवानगीची मुदत संपल्यामुळे नकार दिल्याचे सूत्रांनी संबंधितांना सांगितले. २०१५ मध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ३ हजार सिलिंडर खरेदी केले होते. ५०० सिलिंडर त्यावेळी वापरण्यात आले. उर्वरित सिलिंडर्स कुठे गेले, कुणी नेले, याची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही.