विद्यापीठ घेणार उद्या त्रयस्थ संस्थेमार्फत ‘पेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:11+5:302021-02-05T04:12:11+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल चार वर्षांनंतर शनिवारी, ३० जानेवारी रोजी पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचे (पेट) आयोजन ...

University to take over 'Pet' through third party tomorrow | विद्यापीठ घेणार उद्या त्रयस्थ संस्थेमार्फत ‘पेट’

विद्यापीठ घेणार उद्या त्रयस्थ संस्थेमार्फत ‘पेट’

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल चार वर्षांनंतर शनिवारी, ३० जानेवारी रोजी पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचे (पेट) आयोजन केले असून, ही ऑनलाईन परीक्षा पुण्याच्या खासगी संस्थेमार्फत घेतली जाणार असल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकूण ४२ विषयांची ही परीक्षा घेतली जाणार असून, ११ हजार १३६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. दरम्यान, काल यापैकी ५ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी ‘पेट’पूर्वीची ‘मॉक टेस्ट’ दिली. शनिवारी, ३० जानेवारी रोजी ‘पेट’चा पहिला पेपर होईल. त्यानंतर २१ फेब्रुवारीला दुसऱ्या पेपरसाठी परीक्षा होणार आहे. ‘पेट’ची वैधता एक वर्षासाठी असणार आहे.

मागील चार वर्षांपासून ‘पेट’ घेण्यात आली नव्हती. संशोधनासाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी परीक्षा विभागाला पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेच्या नियोजनाच्या सूचना केल्या. तथापि, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘पेट’पूर्वी विद्यापीठात संशोधनासाठी विषयनिहाय रिक्त जागा, मार्गदर्शकांची उपलब्धतेची यादी जाहीर करणे अनिवार्य होते. त्यानुसार कुलगुरूंनी सर्व विषयांच्या रिक्त जागांचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, एक दिवसावर परीक्षा आली तरीही अद्याप संशोधनासाठी रिक्त जागांची यादी परीक्षा विभागाने जाहीर केलेली नाही.

दुसरीकडे, विद्यापीठाचे संकेतस्थळ व अन्य सर्व तांत्रिक बाबी सांभाळणारा ‘युनिव्हर्सिटी नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सेंटर (युनिक) हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. या विभागात तज्ज्ञ मंडळी कार्यरत आहेत. त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असताना ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला त्रयस्थ संस्थेमध्ये (बाह्यस्रोत) रुची का आहे, ही त्रयस्थ संस्था ‘पेट’ची गोपनीयता व पारदर्शकता राखेल, याबद्दलची हमी कोण देणार, या संस्थेकडे विद्यार्थ्यांचा संपूर्ण ‘डाटा’ आहे, त्यामुळे अनियमितता होऊ शकते, असा प्रश्न पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष गुणरत्न सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी नेते संदेश कांबळे तसेच डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी उपस्थित केला आहे.

चौकट....

तेवढी यंत्रणा ‘युनिक’कडे नाही

यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, ‘युनिक’ने ‘पेट’चे ऑनलाईन नोंदणी, शुल्क वसुली व हॉलतिकीटचे काम केले आहे. त्रयस्थ संस्थेकडून ऑनलाई परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी अनेक तांत्रिक गोष्टी लागतात. तेवढी यंत्रणा ‘युनिक’कडे नाही. हळूहळू ‘युनिक’ त्यादृष्टीने पाऊल उचलत आहे. त्रयस्थ संस्थेची निवड ही अधिष्ठातांचा समावेश असलेली समिती करते. एकटा कोणताही अधिकारी हा निर्णय घेत नसतो.

Web Title: University to take over 'Pet' through third party tomorrow