'महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या'; शरद पवारांचा थेट औरंगाबादमधूनच राज ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 23:23 IST2022-04-26T23:10:18+5:302022-04-26T23:23:29+5:30
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

'महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या'; शरद पवारांचा थेट औरंगाबादमधूनच राज ठाकरेंवर निशाणा
औरंगाबाद- मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या अजेंड्यावर ठाम भूमिका घेतल्यानंतर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असून, १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची सभा होणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली. आमच्या सभेची पूर्वतयारी उत्तम प्रकारे सुरु आहे. औरंगाबादसह मराठवाड्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता दिसून येत आहे. पोलिसांनी अजूनही सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र येत्या १-२ दिवसांत पोलिसांची परवानगी मिळेल, असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमातून त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. माझी त्यांना विनंती आहे, की त्यांनी इतिहास समजून घ्यावा, असं शरद पवार सभेतील भाषणात म्हणाले.
विविध क्षेत्रातील विचारवंतांची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. यातून वाचनसंस्कृती वाढावी हे अपेक्षित आहे. विधिमंडळ सदस्यांच्या निधीचा योग्य वापर करायचा एक आदर्श कार्यक्रम विक्रम काळे यांनी हाती घेतला आहे. pic.twitter.com/RA07VviZCm
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 26, 2022
परवा एका नेत्याने मुंबईत भाषण दिलं आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की, शरद पवार हे सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूराजे यांचेच नाव का घेतात, असं म्हणत माझी विनंती आहे त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रबोधनकार ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राचे सामाजिक परिवर्तन यासंबंधी अतिशय उत्तम लेखन केलं. ते जर वाचलं, तर अशा प्रकारचे प्रश्न कोणी विचारणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरेंची सभा आहे. या सभेला पाच दिवस शिल्लक असताना सभेच्या दोन दिवस आधीच राज ठाकरे कुठे जाणार याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांसोबत बैठका, मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील. यानंतर ३० एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील. सभेला परवानगी मिळाली नसली तरीदेखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे.