वरिष्ठांकडून सतत अपमान अन् मानसिक त्रास; कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:13 IST2025-02-21T13:11:53+5:302025-02-21T13:13:25+5:30

मृताचे वरिष्ठांच्या सोबत झालेल्या संभाषणाचे स्क्रीन शॉट व्हायरल; पत्नीच्या तक्रारीवरून तालुका कृषी अधिकाऱ्यांसह दोघांविरोधात गुन्हा दाखल

Unable to bear the humiliation and mental torture from his superiors, an agricultural assistant ended his life in the office at Sillod | वरिष्ठांकडून सतत अपमान अन् मानसिक त्रास; कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन

वरिष्ठांकडून सतत अपमान अन् मानसिक त्रास; कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन

सिल्लोड : ड्यूटीवर असताना वरिष्ठांकडून होत असलेला अपमान आणि मानसिक त्रास सहन न झाल्याने एका कृषी सहायकाने शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास घडली. योगेश शिवराम सोनवणे (४०, रा. जैनाबाद, जि.जळगाव, ह. मु. शिवाजीनगर, सिल्लोड) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर श्यामलाल बरदे, कृषी सहायक किशोर उत्तमराव बोराडे यांच्याविरोधात पोलिसांत संध्याकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मृताची पत्नी विमल योगेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती योगेश शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायक म्हणून कार्यरत होते. योगेश यांना सुटीच्या दिवशी कार्यालयात बोलावून अतिरिक्त काम करण्यास लावून बरदे आणि बोराडे हे त्यांना नेहमी अपमानित करत होते. बरदे यांच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास योगेश हे कार्यालयात आले होते. कार्यालय उघडून त्यांनी केबिनला दोरी लावून गळफास घेतला. माझ्या पतीच्या आत्महत्येस सदर दोन जबाबदार असल्याचा आराेप मयताच्या पत्नीने या फिर्यादीत केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत योगेश यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सदर दोन आरोपींविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी. आर. कायंदे करीत आहेत.

मी त्रास दिला नाही
सदर कर्मचारी खूप प्रामाणिक होता. माझा सदर कर्मचाऱ्याशी कुठलाही वाद नव्हता. मी त्याला त्रास दिला नाही. तरी त्याने असे का केले, हे सांगता येत नाही; पण तो कर्जबाजारी होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी. या गुन्ह्यात मला विनाकारण गोवण्यात आले आहे.
-ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड

स्क्रीन शॉट व्हायरल
योगेश सोनवणे यांचे आत्महत्येपूर्वी स्वतःच्या मोबाइलवरून संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेले वाद, संभाषण याचे काही स्क्रीन शॉट कृषी खात्याच्या एक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये व्हायरल झाले आहेत. त्यात काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत.

मृताच्या नातेवाइकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
याप्रकरणी सदर दोन जणांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मृताच्या नातवाइकांनी दुपारी २ वाजेपासून शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी संध्याकाळी ७:३० वाजता दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. गुरुवारी रात्री उशिरा योगेश यांच्या पार्थिवावर जैनाबाद (जि.जळगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Unable to bear the humiliation and mental torture from his superiors, an agricultural assistant ended his life in the office at Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.