उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 05:34 IST2025-10-12T05:32:01+5:302025-10-12T05:34:07+5:30
उद्धवसेनेच्या वतीने शनिवारी क्रांती चौक ते गुलमंडी, असा हंबरडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समारोप सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टी व पुरात उभ्या पिकासोबत शेतीही खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना ३७ हजार रुपये पॅकेजमधून व ३ लाख रुपये रोजगार हमी योजनेतून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ही मदत खरंच करणार असाल, तर दिवाळीपूर्वी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून दाखवा, असे आवाहन उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.
उद्धवसेनेच्या वतीने शनिवारी क्रांती चौक ते गुलमंडी, असा हंबरडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समारोप सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मदत मिळणे सुरू झाले आहे. निधीचा पहिला टप्पा यापूर्वीच दिला आहे. दुसरा टप्पा तत्काळ देत आहोत. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत मिळेल हे मान्य केले, ही चांगली बाब आहे. मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरू, असे ते म्हणत असले तरी, आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबईत केलेले घोटाळे आणि चुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत:लाच आसूड मारून घ्यावा. घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता, खुर्ची गेली, तेव्हा हंबरडा फोडला. आता हंबरडा मोर्चा काढत आहेत.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले, याचे आत्मपरीक्षण करावे. जाहीर केलेल्या साडेतीनशे कोटींच्या पॅकेजचे पैसे दिवाळीपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अजित पवार, उपमुख्यमंत्री