शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने दणाणले छत्रपती संभाजीनगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:58 IST2025-10-11T18:58:26+5:302025-10-11T18:58:26+5:30
मराठवाड्यात मागील महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने सुमारे ६६ लाख हेक्टरवरील उभी पिके नेस्तनाबूत झाली.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने दणाणले छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेच पाहिजे, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या, जय भवानी- जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, उध्दव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,अशा घोषणां देत हजारोच्या संख्येने उद्धव सेनेच्या वतीने शनिवारी (दि.११) शहरात हंबरडा मोर्चा काढण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चा आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
मराठवाड्यात मागील महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने सुमारे ६६ लाख हेक्टरवरील उभी पिके नेस्तनाबूत झाली. एवढेच नव्हे तर ढगफुटीसदृश्य पावसाच्या मंडळातील तसेच नदी, नाल्यालगतची शेती पुराच्या पाण्यात खरवडून गेली. अनेक गावांतील शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले. घरसंसाराचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्याव, त्यांना कर्जमुक्त करावे आणि पिक विम्याचे निकष बदलावे या प्रमुख मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने मोर्चाची हाक देण्यात आली होती. या मोर्चाच्या दोन दिवस आधीच राज्यसरकारने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज फसवे असल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज क्रांतीचौक ते गुलमंडी असा भव्या मोर्चा काढला. गळ्यात शिवसेनेचे गमचे आणि हातात कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या, अशी मागणी करणारे फलक घेऊन हजारो शिवसैनिक, शेतकरी आणि महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. कडक उन्हात उद्धव आणि आदित्यठाकरे हे पितापुत्र क्रांतीचौक ते गुलमंडीपर्यंत चालत गेले.
यावेळी त्यांच्यासोबत खा. संजय राऊत, खा. ओमराजे निंबाळकर, खा.अरविंद सावंत, माजी खा.चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आ. कैलास पाटील, माजी आमदार उदय राजपूत, ज्योती ठाकरे, राजू वैद्य, सचीन घायाळ, सुनीता आऊलवार, सुकन्या भोसले, राजू दानवे, संतोष खेंडके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचा समारोप गुलमंडी येथे जाहिर सभेत झाला.यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेला मार्गदर्शन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारणाऱ्रूा शेतकरी भूषण कोळी, पळशी येथील शेतकरी नानासाहेब पळसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आ. दानवे यांनी सभेचे सूत्रसंचलन केले.
मोर्चेकऱ्यांसाठी अन्नाचे पाकिटाची व्यवस्था
संपूर्ण मराठवाड्यातून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी या मोर्चासाठी आले होते. पक्षाच्यावतीने त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच अन्नाचे पाकिटाची व्यवस्था करण्यात आली होती.
विभागीय आयुक्तांना निवेदन
उद्धवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या चे निवेदन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना कार्यालयात जाऊन देण्यात आले. यावेळी पक्षाचे महानगर प्रमुख राजू वैद्य, उपनेते सचिन घायाळ, एकनाथ नवले यांची उपस्थिती होती.
शहरीबाबूंनी दोन गोष्टी करून दाखवल्या
आम्ही तर शहरी बाबू शेतकऱ्यांपर्यंत काय जाणार असे विरोधक म्हणत होते. पण आम्ही शहरी बाबूंनी दोन गोष्टी करून दाखवल्या आहे. एक पावसात दसरा मेळावा अन् दुसरा कडक उन्हात हंबरडा मोर्चा काढून दाखवला.