मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची दोन चाके निखळली, प्रवरा संगमवर धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:45 IST2025-08-26T16:38:38+5:302025-08-26T16:45:01+5:30

चालकामुळे प्रवासी बालंबाल वाचले; मात्र रात्री १२ ते ५ वाजेपर्यंत प्रवासी ताटकळले

Two wheels of a Mumbai going Humsafar travel's bus came off, shocking incident at Pravara Sangam | मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची दोन चाके निखळली, प्रवरा संगमवर धक्कादायक घटना

मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची दोन चाके निखळली, प्रवरा संगमवर धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर : मुंबईसाठी निघालेल्या चालत्या हमसफर कंपनीच्या ट्रॅव्हल्सची डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात चालकाने प्रसंगावधान राखल्याने २५ पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव वाचून मोठी दुर्घटना टळली. मात्र, सोमवारी प्रवाशांनी कंपनीला या बेजबाबदारपणाबाबत कॉल करून विचारणा केली असता कंपनीने हात वर करत जबाबदारीच झटकल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

हमसफर कंपनीची (एमएच २० जीडब्ल्यू ४७८६) बस रविवारी रात्री प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली. प्रवरा संगमपर्यंत जाताच बस कलंडल्याने प्रवासी घाबरले. जवळपास ४० ते ४५ डिग्री सेल्सिअसमध्ये बस कलंडल्याने काय घडलेय, हे कळेपर्यंत चालकाने बस नियंत्रणात आणत रस्त्याच्या खाली नेत कडेला उभी केली. बस तिरकी झाल्याने बऱ्याच अंतरापर्यंत रस्त्यावर बसचे पत्रे घासत गेले. प्रवाशांनी उतरून पाहिल्यावर डावीकडील दोन्ही चाके निखळलेली दिसली. घाबरलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यावर चालकाने चाकाचे स्क्रू ढिले झाल्याचे कारण दिले.

बस येईल की चाक?
चालकाने कंपनीला घटनेबाबत कळवून प्रवाशांना दुसऱ्या बसने मुंबईला पोहोचवण्याची हमी दिली. दोन तासांनी कंपनीने नवी चाके पाठवत असल्याचे सांगत वेळ मारून नेली. पहाटे ५ वाजूनही काहीच होत नसल्याने प्रवाशांनी अखेर कुटुंबीयांशी संपर्क साधला. काहींनी दुसऱ्या वाहनाने पुन्हा घर गाठले. सोमवारी प्रवाशांनी दिवसभर कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने मात्र प्रतिसाद दिला नाही. पैसेही परत दिले नाहीत. ‘लोकमत’ने कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी व्यवस्थापकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जबाबदारी टाळणे धक्कादायक
हा प्रश्न तिकिटाच्या पैशांचा नाही. २५ ते ३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसची चाके निखळणे ही गंभीर बाब असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे; पण कंपनीने कुठलीच जबाबदारी घेतली नाही. फोनला प्रतिसादही दिला नाही.
- हरीश जाखेटे, प्रवासी तरुणीचे वडील

Web Title: Two wheels of a Mumbai going Humsafar travel's bus came off, shocking incident at Pravara Sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.