वैजापूर शहराजवळ ट्रक-बाइकच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत बाईकवरील दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:40 IST2025-10-31T16:39:38+5:302025-10-31T16:40:01+5:30
वैजापूर-येवला महामार्गावर आणि नागपूर-मुंबई महामार्गावर झाले दोन अपघात

वैजापूर शहराजवळ ट्रक-बाइकच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत बाईकवरील दोघांचा मृत्यू
वैजापूर : दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्वार ठार झाले. या दोन्ही घटना वैजापूर शहराजवळ गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान घडल्या. सुरेश सोपान बंगाळे (वय ४०, रा. तिडी, ता. वैजापूर), व जब्बर सोळंकी(वय ३८, रा. डालकी, जि. खरगोन, मध्यप्रदेश) अशी मयतांची नावे आहेत.
वैजापूर तालुक्यातील तिडी येथील सुरेश बंगाळे हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. ते वैजापूर येथून काम आटोपून गुरुवारी सायंकाळी नागपूर-मुंबई महामार्गावरून गावी तिडी येथे निघाले होते. दरम्यान, ७ वाजता शहरानजीक एका पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या आयशर ट्रक (एमएच २० इएल ०८७६)ने जोराची धडक दिली. गंभीर जखमी होऊन बंगाळे हे रस्त्यावर पडले. नागरिकांनी धाव घेत वाहेद पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथील डॉक्टरांनी तपासून बंगाळे यांना मयत घोषित केले. बंगाळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे.
अपघाताची दुसरी घटना शहरातील वैजापूर-येवला महामार्गावर विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यात जब्बर सोळंकी या मध्यप्रदेशातील कामगाराची दुचाकी (एमएच २० इयू ६४१३) ट्रकला पाठीमागून जोराने धडकली. यात सोळंकी यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी धाव घेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.