लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, ८ लाख रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:16 IST2025-06-02T14:16:26+5:302025-06-02T14:16:35+5:30

उद्योजकाच्या घरावरील दरोडा प्रकरण, आरोपींमध्ये बाप-लेकीचा समावेश

Two more accused arrested in Ladda robbery case, Rs 8 lakh seized | लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, ८ लाख रुपये जप्त

लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, ८ लाख रुपये जप्त

छत्रपती संभाजीनगर : बजाज नगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केलेल्या आरोपीची पत्नी आणि सासऱ्याला अटक केली. या दोघांकडून गुन्ह्यातील सोने विकून आणलेले ८ लाख रुपये रोख आणि १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला. आरोपी सासऱ्याला न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर पत्नीची प्रकृती खालावल्यामुळे घाटी रुग्णालयात दाखल केले.

पोलिस कोठडीतील आराेपी सुरेश ऊर्फ सूर्यकांत गंगणे याची पत्नी बबिता गंगणे (रा. कुत्तर विहीर, अंबाजोगाई, जि. बीड) व सासरा भारत नरहरी कांबळे (रा. मोटेगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) अशी नव्याने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर सहा जणांनी दरोडा टाकून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी, ७० हजार रुपये रोकड असा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे तपास करत आहेत. दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरचे साथीदार सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, सय्यद अजहरोद्दीन कबीरोद्दीन, सोहेल जलील, महेंद्र बिडवे व योगेश हजबे यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यात अमोल खोतकर याचा एन्काऊंटर झाला.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी आणखीन पाच जणांना अटक केली. त्यात सिडको वाळूज महानगर, वडगाव कोल्हाटी येथील आरोपींचा समावेश होता. या दरोड्यात सहभागी बीड येथील सुरेश ऊर्फ सूर्यकांत गंगणे याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याची पत्नी बबिता, सासरा भारत कांबळे यांना अटक केली. बबिताच्या ताब्यातून ३ लाख तर भारतच्या ताब्यातून ५ लाख अशी एकूण ८ लाख रुपयांची रोकड व १० हजार रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.

३ जूनपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी आरोपी भारत कांबळे याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांनी दिले. तर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या बबिता सुरेश गंगणे हिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी निरीक्षक संदीप गुरमे यांनी न्यायालयात अर्जाद्वारे सादर केली. या प्रकरणात सरकारी वकील विशाल साक्री यांनी काम पाहिले.

Web Title: Two more accused arrested in Ladda robbery case, Rs 8 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.