शेतीच्या वादातून दोन गट भिडले; एकाच्या डोक्याला पिस्तूल लावले, चाकूने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST2025-06-05T18:28:27+5:302025-06-05T18:28:52+5:30

दोन गटांतील मारहाणीचे प्रकरण; परस्परविरोधी तक्रारीवरून ३० जणांविरुद्ध गुन्हा

Two groups clashed over a farming dispute; one was held to the head with a pistol and stabbed with a knife | शेतीच्या वादातून दोन गट भिडले; एकाच्या डोक्याला पिस्तूल लावले, चाकूने केले वार

शेतीच्या वादातून दोन गट भिडले; एकाच्या डोक्याला पिस्तूल लावले, चाकूने केले वार

खुलताबाद : तालुक्यातील खिर्डी-सोनखेडा शिवारातील शेताच्या वादातून दोन गटांत मंगळवारी दुपारी झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात जवळपास ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकाच्या डोक्याला पिस्तूल लावून चाकूने वार केल्याची बाब समोर आली आहे. या हाणामारीत ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत हुसेन इकबाल बेग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, खिर्डी-सोनखेडा शिवारातील त्यांच्या गट नंबर ११४ मध्ये शेतीमध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ७ ते ८ अनोळखी महिला, १० ते १५ ते वीस अनोळखी पुरुष शेतातील तार कंपाऊंड तोडू लागले. बेग यांनी याबाबत विचारणा केली असता, त्यातील संशयित अनोळखी महिला, पुरुष आरोपींनी गणेश सोनवणे यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता सोड, नाही तर तुला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत त्यातील एकाने हुसेन बेग यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. दुसऱ्याने बेग यांना नाकावर बुक्का मारला व एकाने जीवे मारण्याचे उद्देशाने हातातील चाकू पोटात व दंडात मारून हुसेन बेग यांना जखमी केले.

तेथील तार कंपाउंडचे काम करणारे मिर्झा शाहबाज शेख, उबेद बेग अकबर बेग, अकबर शेख, ताहीख बेग (सर्व रा. खुलताबाद) हे हुसेन बेग यांना वाचण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांनाही चाकू, लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीत हुसेन बेग इकबाल बेग, अकबर बेग इकबाल बेग, उबेद बेग कादर बेग, सलमान शेख यांच्यासह सात ते आठजण जखमी झाले. या जखमींवर खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी बेग यांच्या फिर्यादीवरून गणेश सोनवणे (रा. सोनखेडा) व इतर सात ते आठ अनोळखी महिला आणि १५ ते २० अनोळखी पुरुष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच प्रकरणी दुसऱ्या बाजूने ज्योती मिलिंद तुपविहिरे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली असून, त्यात म्हटले आहे की, आम्ही त्या ठिकाणी गेलो असता, समोरच्या लोकांनी शिवीगाळ करत लाठ्या-काठ्यांनी आम्हाला जबर मारहाण केली. त्यावरून त्यावरून १० ते १५ अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केला दंगलीचा गुन्हा
खुलताबाद पोलिसांच्या वतीनेही याप्रकरणी जमादार उत्तम खटके यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दोन्ही गटांच्या लोकांनी बेकायदेशीररीत्या लोक जमा करून गोंधळ घातला असून, कायदा व सुव्यवस्था बिघडवली. त्यामुळे दोन्ही गटांविरोधात खुलताबाद पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली.

Web Title: Two groups clashed over a farming dispute; one was held to the head with a pistol and stabbed with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.