आयपीएस पंकज अतुलकरसह नाशिकच्या दोन डॅशिंग पोलिस अधिकारी छत्रपती संभाजीनगरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:42 IST2025-06-28T19:40:27+5:302025-06-28T19:42:20+5:30
आयपीएस पंकज अतुलकर यांच्यासह शर्मिष्ठा घारगे शहराच्या पोलिस उपायुक्तपदी

आयपीएस पंकज अतुलकरसह नाशिकच्या दोन डॅशिंग पोलिस अधिकारी छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगर : आयपीएस अधिकारी पंकज अतुलकर यांच्यासह नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांची शहराच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी माधुरी कांगणे यांची वर्णी लागली आहे.
शुक्रवारी गृहमंत्रालयातर्फे राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलिस उपायुक्त, अपर अधीक्षकांच्या बदल्या जाहीर झाल्या. एकूण ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. शहर पोलिस मुख्यालय, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांची मुंबईस्थित मुख्यमंत्री सुरक्षा, विशेष सुरक्षा विभागाच्या अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षक संदीप आटोळे यांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली.
नाशिकच्या दोन डॅशिंग अधिकारी शहरात
नाशिक शहर व जिल्ह्यात उल्लेखपूर्ण कारवाई करणाऱ्या माधुरी कांगणे छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षकपदी तर नाशिक एसीबी विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर या शहराच्या उपायुक्तपदी येत आहेत.
उपायुक्तपदी पुन्हा आयपीएस
शहराला गत वेळी नितीन बगाटे व नवनीत काँवत हे दोन तरुण आयपीएस अधिकारी उपायुक्त म्हणून लाभले होते. आता पुन्हा गृहमंत्रालयाने २०२० चे तरुण आयपीएस अधिकारी असलेले पंकज अतुलकर यांची उपायुक्तपदी नियुक्ती केली.
अन्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या
एटीएस अधीक्षक सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांची नागपूरच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली. रत्नागिरीच्या अपर अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजीनगर विभागाच्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्त, परभणीचे अपर अधीक्षक यशवंत काळे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी वर्णी लागली.