छत्रपती संभाजीनगरजवळ रात्री दोन अपघात; एकात दुचाकीस्वार ठार, दुसऱ्यात दोन कारची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:55 IST2025-07-22T11:55:01+5:302025-07-22T11:55:40+5:30
अपघातास कारणीभूत ‘भारत सरकार’ पाटी लावलेल्या कारमध्ये बीअरची बाटली आढळून आली

छत्रपती संभाजीनगरजवळ रात्री दोन अपघात; एकात दुचाकीस्वार ठार, दुसऱ्यात दोन कारची धडक
छत्रपती संभाजीनगर : पडेगावमध्ये रामगोपालनगर येथे एका भरधाव कारने दुसऱ्या कारला पाठीमागून धडक दिली. यात समोरील कारमधील प्रवासी जखमी झाले. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, धडक देणारी कार टॅक्सी पासिंग असून, तिच्यावर ‘भारत सरकार’ अशी पाटी लावलेली होती. शिवाय, चालकाच्या समोरील भागावर बीअरची बाटली आढळल्याचे स्थानिकांनी सांगितले.
तर दुसऱ्या एका घटनेत वाळूजच्या दिशेने जाणाऱ्या ५० वर्षीय दुचाकीस्वाराचा सुसाट वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मुकेश चंद्रभान शिंगाडे, असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री ११:०० वाजता नगर नाका परिसरात हा अपघात घडला.
मूळ अमरावतीचे असलेले मुकेश बीएसएनएलमध्ये लिपिक होते. शहरात बदली झाल्याने पत्नी, मुलगा व मुलीसह ते तार भवन येथील शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते. सोमवारी कार्यालयात काम करून ते सायंकाळी घरी गेले होते. रात्री १०:०० वाजेच्या सुमारास ते घराबाहेर पडून दुचाकीने (एमएच २७ बीसी ४४३३) वाळूजच्या दिशेने निघाले होते. याचदरम्यान नगर नाका परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक देऊन पोबारा केला. यात शिंगाडे दूरवर फेकले जाऊन रस्त्यावर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.