उसतोड मजुरांना नेणारा ट्रक टिप्परवर धडकला; दोन मजूर ठार, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 17:35 IST2021-10-22T17:32:23+5:302021-10-22T17:35:37+5:30
पाचोरा येथून एक आयशर ट्रक ( क्रमांक एमएच 20 ईएल 7638 ) बारामतीला ऊस तोडणीसाठी मजूर घेऊन जात होता.

उसतोड मजुरांना नेणारा ट्रक टिप्परवर धडकला; दोन मजूर ठार, पाच जखमी
सिल्लोड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या टिप्परला धडकला ( The truck carrying the laborers hit the tipper) . या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात सकाळी पाच वाजेच्या सुमारास सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावरील धानोरा फाटा येथे घडला.
पाचोरा येथून एक आयशर ट्रक ( क्रमांक एमएच 20 ईएल 7638 ) बारामतीला ऊस तोडणीसाठी मजूर घेऊन जात होता. सिल्लोड तालुक्यातील धानोरा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक टिप्पर ( एमएच 20 सीटी 1613) उभा होता. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या टिप्परला धडकला. या अपघातामध्ये ट्रकमधील कल्पना यमाजी पवार (वय 40, रा.मोहाडी, ता.पाचोरा) व प्रशांत विठ्ठल वाघ (वय 36, रा.हनुमानवाडी, ता.माळशिरस, जि.सोलापूर) हे जागीच ठार झाले. तर निलेश यमाजी पवार (वय 12, रा.मोहाडी, ता.पाचोरा), रुखमाबाई किसन पवार (वय 60), सागर किसन पवार (वय.20), अनिल गंगाराम पवार (वय 28, सर्व रा.पाचोरा) व सुभाष इंदर राठोड (वय 32, रा.मध्य प्रदेश) हे पाच मजूर गंभीर जखमी झाले.
जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करुन औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या ट्रकमध्ये एकूण 20 मजूर होते. या पैकी काही मजूर किरकोळ जखमी झाले. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामेश्वर जाधव करीत आहेत.