छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वी व १२ वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. हे तिन्ही निकाल एकाच दिवशी लागल्याने मिठाईच्या दुकानांमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशीही पेढ्यांना मोठी मागणी राहिली. गेल्या दोन दिवसांत शहरात ६० क्विंटलपेक्षा अधिक पेढ्यांची विक्री झाली.
दूधपेढा, कंदी व ‘केशर बदाम’ला मागणीविद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आनंदोत्सवासाठी दूधपेढा, कंदी आणि ‘केशर बदाम’ पेढा खरेदी केला. हे पेढे ४८० ते ७०० रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले. काहींनी अर्धा किलो, तर काहींनी दोन किलोपर्यंत पेढ्यांची खरेदी केली.
मिठाई विक्रेत्यांची धावपळ१० वीचा निकाल लागणार असल्याची माहिती एक दिवस आधी मिळाल्याने मिठाई विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. कारण, एरव्ही शहरात १० ते १५ क्विंटल पेढ्यांचीच तयारी होते. मात्र, तिन्ही निकाल एकाच दिवशी लागल्यामुळे दूध आणि इतर कच्चा माल एकवटण्यात मिठाई विक्रेत्यांना मोठा आटापिटा करावा लागला. ५ मे रोजी १२ वीचा निकाल लागला तेव्हा शहरात ३५ क्विंटल पेढे विकले गेले होते. तिहेरी निकालामुळे गेल्या दोन दिवसांत एकूण ६० क्विंटलहून अधिक पेढे विकल्याची माहिती मिठाई व्यावसायिक राजेश पवार यांनी दिली.