तहसीलदारांच्या गाडीतून प्रवास, गोपनीय कागदपत्रांचा ताबा; तो 'एजंट' पैठणचा प्रतितहसीलदारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:39 IST2025-03-05T14:38:07+5:302025-03-05T14:39:40+5:30

लाचेची पहिली रक्कम ऑनलाइन स्वीकारली, पैशांसोबत लाच म्हणून वाळूचीही मागणी

Traveling in Tehsildar's car, possession of confidential documents; the 'agent' is shadow of Tehsildar of Paithan | तहसीलदारांच्या गाडीतून प्रवास, गोपनीय कागदपत्रांचा ताबा; तो 'एजंट' पैठणचा प्रतितहसीलदारच

तहसीलदारांच्या गाडीतून प्रवास, गोपनीय कागदपत्रांचा ताबा; तो 'एजंट' पैठणचा प्रतितहसीलदारच

छत्रपती संभाजीनगर : कागदोपत्री शेतकरी असलेला सलील करीम शेख (रा. लक्ष्मीनगर, पैठण) याचा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यासारखाच तहसील कार्यालयात वावर होता. नेहमी तहसीलदारांच्या गाडीतून प्रवास, तहसीलची सर्व गोपनीय कागदपत्रे, आदेशांचाही ताबा त्याच्याकडे असायचा. त्यामुळे प्रत्यक्षात एजंट असलेला सलील पैठणचा 'प्रतितहसीलदार’च होता. सोमवारी लाचेच्या सापळ्यात अडकल्यानंतर तहसील कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतचे त्याचे घनिष्ठ संबंध, त्याच्याकडे असलेल्या शासकीय कागदपत्रांचे पुरावेच उघडकीस आले.

वाळू व्यावसायिकाचे जप्त वाहन सोडण्यासाठी ५० हजार रुपये स्वीकारून १ लाख २० हजारांची लाच सलीलने तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या नावे मागितली होती. व्यावसायिकाने १७ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर एसीबीकडे तक्रार केली. १८ फेब्रुवारीपासून तब्बल सहा वेळा सापळा रचण्यात आला. २४ फेब्रुवारी रोजी चव्हाण यांनी पैसे घेतले नाहीत. सोमवारी तक्रारदाराच्या गावातच सलील ५०० रुपयांच्या २२० नोटा म्हणजेच १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला.

सोळा तास खासगी लॉजवर चौकशी
सोमवारी दुपारी ३:४९ ते ४:५२ पर्यंत कारवाईनंतर सलीलला ताब्यात घेत पैठणच्या लॉजवर नेले. चव्हाणलाही ताब्यात घेत लॉजवर नेले. तब्बल १६ तास दोघे लॉजवर एसीबीच्या ताब्यात होते. मंगळवारी सकाळी १० वाजता गुन्हा दाखल केला गेला. दुपारी दोन वाजता दोघांच्या अटकेची नोंद केली. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या हवाली केले. कारवाईत इतका विलंब का झाला, यावरूनही अहिल्यानगर एसीबीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उपअधीक्षक संगीता पाटील अधिक तपास करत आहेत.

लाच म्हणून वाळूची मागणी
चव्हाण यांच्या कार्यालयात कार्यरत सहायक हरीश शिंदे हा या गुन्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. त्याने तक्रारदाराला स्वतंत्र ३० हजार रुपयांसह लाच म्हणून घरी दोन हायवा वाळू टाकण्याची अट घातली होती. दोघे अडकल्याचे कळताच शिंदे पसार झाला.

व्हॉटस्ॲपवर पत्र
सलीलच्या व्हॉटस्ॲप तपासणीत चव्हाण यांच्यासोबत कार्यालयीन पत्रव्यवहाराची देवाणघेवाण केल्याची बाब आढळली. त्याच्या खासगी वाहनात तहसीलच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे गठ्ठे असल्याची धक्कादायक बाब उघड आली. अनेदा तो रात्री उशिरापर्यंत 'साहेबां’च्या घरी जाऊन गोपनीय फाइल्सवर सह्या घेई.

Web Title: Traveling in Tehsildar's car, possession of confidential documents; the 'agent' is shadow of Tehsildar of Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.