सिमेंट मिक्सरचा वीज तारांना स्पर्श अन् दोन तरुण मजूर जागीच ठार; छ. संभाजीनगरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:48 IST2026-04-13T12:36:45+5:302026-04-13T12:48:37+5:30

मिसारवाडीत लोंबकळणाऱ्या तारा ठरल्या कर्त्या तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत; सुरक्षा साधनांचा अभाव नडला.

Tragic Death in Chhatrapati Sambhajinagar: Mixer Machine Touches Live Wire, Killing Two Young Labours | सिमेंट मिक्सरचा वीज तारांना स्पर्श अन् दोन तरुण मजूर जागीच ठार; छ. संभाजीनगरातील घटना

सिमेंट मिक्सरचा वीज तारांना स्पर्श अन् दोन तरुण मजूर जागीच ठार; छ. संभाजीनगरातील घटना

छत्रपती संभाजीनगर : घराचे बांधकाम सुरू असताना लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांना सिमेंट मिक्सरच्या स्ट्रक्चरचा स्पर्श झाल्यामुळे दोन बांधकाम मजुरांचा विजेचा तीव्र धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना मिसारवाडी भागात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली.

विशाल अंकुश चव्हाण (२६, रा. जयभवानीनगर) आणि मलकन बापू जाधव (३५, रा. विठ्ठल मंदिराजवळ, मुकुंदवाडी) अशी मृत मजुरांची नावे आहेत.

पोलिस आणि नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसारवाडीतील एका अरुंद गल्लीत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रविवारी दुसऱ्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डा खोदून सिमेंट मिक्सर ट्रॉली उभी केली होती. सिमेंट कॉक्रिंट माल वर नेण्यासाठी बसवलेल्या ऑटोमॅटिक स्ट्रक्चरच्या अगदी वरूनच महावितरणच्या विजेच्या तारा आहेत. स्लॅब भरण्याचे काम दिवसभर सुरू होते. काम सुरू असताना या स्ट्रक्चरचा तारांना स्पर्श झाला. याच वेळी सिमेंट माल घेण्यासाठी गेलेल्या या दोन्ही मजुरांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते लांब फेकले गेले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

निष्काळजीपणामुळे मृत्यूचा नातेवाइकांचा आरोप
बांधकामाच्या ठिकाणाहून विजेच्या तारा जात असल्यास त्याबाबत महावितरणला पूर्वकल्पना देणे अपेक्षित असते. त्याकाळात महावितरणकडून तात्पुरता विद्युत प्रवाह खंडित केला जातो. मात्र, संबंधित ठेकेदाराने याबाबत पूर्वसूचना दिली नव्हती, तसेच मजुरांना काम करताना हेल्मेट, हँडग्लोज यासारखी कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नाहीत. या निष्काळजीपणामुळेच दोन मजुरांना जीव गमवावा लागला, असा आरोप नातेवाइकांनी केला.

नातेवाइकांची ठाण्यात गर्दी
माहिती मिळताच विशालच्या नातेवाइकांनी सिडको पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. दुर्घटनेनंतर घरमालक आणि ठेकेदार पसार झाले आहेत. त्यांच्याच निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांनी नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे समजून सांगितले.

घरातील कर्ता तरुण गेला
मृत विशाल चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि अवघ्या एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. विशालच्या वडिलांचे अगोदरच निधन झालेले असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आणि मोठ्या भावावर होती. विशालच्या अचानक जाण्याने दोन्ही लेकरे पोरकी झाली आहेत.

Web Title : सीमेंट मिक्सर तारों से टकराया, छत्रपति संभाजीनगर में दो मजदूरों की मौत

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में सीमेंट मिक्सर बिजली के तारों से टकराने से दो मजदूरों की मौत हो गई। ठेकेदार पर सुरक्षा उपायों की कमी का आरोप।

Web Title : Cement mixer touches wires, two laborers die in Chhatrapati Sambhajinagar.

Web Summary : Two laborers died in Chhatrapati Sambhajinagar after a cement mixer touched live electrical wires. Negligence alleged against contractor for lack of safety measures.