दुसऱ्याच्या दुचाकीचा क्रमांक टाकून तोडले वाहतूक नियम; दंडाच्या पावतीने मात्र मूळ मालकास मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 19:04 IST2018-09-28T19:02:29+5:302018-09-28T19:04:44+5:30
दुसऱ्याच्या दुचाकीचा क्रमांक टाकून विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चोरट्याला सोडून वाहतूक पोलिसांनी दुसऱ्यालाच दंडाची नोटीस पाठविल्याचे समोर आले.

दुसऱ्याच्या दुचाकीचा क्रमांक टाकून तोडले वाहतूक नियम; दंडाच्या पावतीने मात्र मूळ मालकास मनस्ताप
औरंगाबाद : दुसऱ्याच्या दुचाकीचा क्रमांक टाकून विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चोरट्याला सोडून वाहतूक पोलिसांनी दुसऱ्यालाच दंडाची नोटीस पाठविल्याचे समोर आले. चोर सोडून संन्याशाला फाशी, या म्हणीप्रमाणे पोलिसांच्या कारभारामुळे मानसिक त्रास सहन करणाऱ्या दुचाकीचालकाने थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
एन-११, टीव्ही सेंटर येथील रहिवासी संतोष सांडू पवार यांनी आठ वर्षांपूर्वी त्यांनी होंडा कंपनीची मोटारसायकल (एमएच-२० बीएस ९९९९) खरेदी केली आहे. पोलीस आयुक्तालयातील सेफ सिटी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पोस्टाद्वारे पाठविलेली नोटीस नुकतीच त्यांना प्राप्त झाली. या नोटीसमधील मजकुरानुसार ७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास पंढरपूर एमआयडीसीतील ओयॉसिस चौकातून विनाहेल्मेट दुचाकी चालवून वाहतूक नियमाचा भंग केला आहे.
नियमानुसार तडजोड रक्कम म्हणून पाचशे रुपये दंड पोस्ट कार्यालयातील अथवा अॅक्सिस बँकेच्या संबंधित खात्यात जमा करावी, असे नमूद केले. एवढेच नव्हे तर ही रक्कम नोटीस मिळाल्यापासून १४ दिवसांच्या आत न भरल्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. ही नोटीस हातात पडताच संतोष यांना धक्काच बसला. कारण त्यांची मोटारसायकल ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चिकलठाणा एमआयडीसीमध्ये उभी होती.
एवढेच नव्हे तर नोटीसमधील दुचाकी ही दुसऱ्याच मॉडेलची होती. परंतु त्या दुचाकीवरील क्रमांक एमएच-२० बीएस ९९९९ आणि त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक एकसारखाच असल्याचे त्यांना स्पष्ट दिसत होते. क्रमांकावरून पोलिसांनी गाडीमालकाचे नाव आणि पत्ता मिळवून संतोष यांना घरपोच नोटीस पाठविली. मात्र याबाबतची खात्री करण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही. दुसऱ्याच्या मोटारसायकलचा क्रमांक स्वत:च्या मोटारसायकलवर टाकून दुचाकी चालविणारा व्यक्ती हा गुन्हेगार असावा, असा संशय आहे. त्याला पकडण्याऐवजी पोलिसांनी कोणतीही चूक नसलेल्या संतोष यांनाच घरपोच दंडाची नोटीस पाठविली.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
संतोष पवार यांचे बंधू चैतन्य पवार म्हणाले की, याप्रकरणी आम्ही पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. चूक केली नसल्याने दंड आम्ही भरणार नाही.