टोरेससारखा क्विक स्टार्टचा ३५ कोटींचा घोटाळा; संचालक सहा महिन्यांपूर्वीच देश सोडून विदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:56 IST2025-01-22T11:55:17+5:302025-01-22T11:56:38+5:30
कंपनीचे मुख्य संचालक व आरोपी हर्षल याेगेश गांधी आणि प्रतीक एम. शहा (दोघेही रा. अहमदाबाद) हे सहा महिन्यांपूर्वी देश सोडून अरब देशात पसार झाले आहेत.

टोरेससारखा क्विक स्टार्टचा ३५ कोटींचा घोटाळा; संचालक सहा महिन्यांपूर्वीच देश सोडून विदेशात
छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील टोरेस घोटाळ्याप्रमाणे शहरात दरमहा ३ टक्के परतावा, विदेशवारी व महागड्या बक्षिसांचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपये उकळले. कंपनीचे मुख्य संचालक व आरोपी हर्षल याेगेश गांधी आणि प्रतीक एम. शहा (दोघेही रा. अहमदाबाद) हे सहा महिन्यांपूर्वी देश सोडून अरब देशात पसार झाले आहेत.
शनिवारी जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त उपअभियंता सरताजसिंग चहल यांनी तक्रार दिल्यानंतर जवळपास दीड हजार गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांना अटक केली. चौघांनी मिळून मराठवाड्यासह राज्यातील अनेक शहरांत सामान्यांकडून पैसे उकळले. देशातील २४ कंपन्यांत पैसे गुंतवून परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. शहा, गांधीच्या शोधासाठी सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांचे पथक सोमवारीच अहमदाबादमध्ये दाखल झाले. मात्र, त्यांना आरोपी मिळून आले नाहीत.
सहा महिन्यांपूर्वी कार्यालय रिकामे
पथकाने शहा, गांधीचे अहमदाबादमधील कार्यालय गाठले. मात्र, तेथे आता दुसरेच कार्यालय आहे. दोघांनी सहा महिन्यांपूर्वीच जागा सोडल्याचे स्थानिकांकडून कळाले. शिवाय, घरातील सदस्यही दुसरीकडे स्थायिक झाले. ते राहत असलेले घरदेखील भाडेतत्त्वावरचे होते.
लुक आउट नोटीस जारी
दोघांनी देश सोडून पलायन केले. हे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी इमिग्रेशनला त्यांच्याबाबत ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केला हाेता. त्यानंतर चोवीस तासांत त्यांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी झाल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.