छत्रपती संभाजीनगराजवळील औरंगजेब कबर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:59 IST2025-03-07T18:58:09+5:302025-03-07T18:59:32+5:30

मुघल सम्राट औरंगजेबची कबर खुलताबाद येथील जैनोद्दीन चिश्ती यांचा दर्गा येथे आहे.

Tight police security in Aurangzeb Tomb area near Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगराजवळील औरंगजेब कबर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगराजवळील औरंगजेब कबर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : मागील महिन्यात प्रदर्शित छावा चित्रपटानंतर अनेक नेत्यांची वक्तव्य आणि सोशल मीडियातून देशभरात औरंगजेब प्रकरणावरून मोठा गदारोळ उडालेला आहे. अनेक हिंदूत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब कबरीबाबत अपशब्द वापरुन इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी या कबर परिसरास कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मुघल सम्राट औरंगजेबची कबर खुलताबाद येथील जैनोद्दीन चिश्ती यांचा दर्गा येथे आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रपट, नेत्यांची वक्तव्य यामधून औरंगजेब प्रकरण देशभरात तापले आहे. याच प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानसभेत आणि बाहेरही अनेक आरोपप्रत्यारोप, इशारे सुरू झाले आहेत. त्यामुळे दक्षता म्हणून खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबर परिसरात पोलीसांनी तसेच पुरातत्व विभागाने अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. हे सुरक्षा कर्मचारी भाविक व पर्यटकांवर लक्ष ठेवून आहे. या परिसरात व्हिडीओ शुटींग, फोटो काढण्यास बंदी आहे. मात्र, अचानक उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी येथे दाखल झाले असून वार्तांकन करताना दिसत आहेत.

अबू आझमींना औरंगजेब प्रेम भोवले; निलंबनाची कारवाई
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी विधानभवन आवारात औरंगजेब किती चांगला शासक होता, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून मंगळवारी विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर औरंगजेबाचे कौतुक करणारे आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेत बुधवारी घेण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानभवन आवारात येण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. अबू आझमी यांच्या निलंबनावरून सत्ताधारी सदस्य प्रचंड आक्रमक झाले होते. विधानसभेत यावरून जोरदार गदारोळ तसेच घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

औरंगजेब उदात्तीकरण; योगी आदित्यनाथ भडकले
मुघल शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याबद्दल आमदार अबू आझमी यांची समाजवादी पक्षाने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली आहे. अबू आझमी यांना उत्तर प्रदेशमध्ये आणा; अशा लोकांची ‘काळजी’ घेण्याचे उत्तर प्रदेशला चांगलेच माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Tight police security in Aurangzeb Tomb area near Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.