थरारक! अचानक पुराच्या पाण्यात बाईक घातली; वाहून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 20:22 IST2025-09-24T20:19:35+5:302025-09-24T20:22:05+5:30
अंजना नदीच्या पुलावर जीवघेणा थरार, गावकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव

थरारक! अचानक पुराच्या पाण्यात बाईक घातली; वाहून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवले
भराडी (छत्रपती संभाजीनगर): सिल्लोड तालुक्यातील उपळी गावाजवळ अंजना नदीच्या पुरात एका तरुणाला वाहून जाताना गावकऱ्यांनी वाचवल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी या थरार घटनेत स्थानिकांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला.
नेमके काय घडले?
उपळी गावाजवळ अंजना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असतानाही, केऱ्हाळा येथील सय्यद सोहेल सय्यद गनी (वय ३०) हा तरुण आपल्या मित्रांसोबत दुचाकी घेऊन पुराच्या पाण्यात शिरला. मात्र, पाण्याला पाहून त्याने बाईकवरून उडी घेतली. मात्र, अंदाज न आल्याने सोहेल नदीच्या प्रवाहात पडला आणि वेगाने वाहून जाऊ लागला. हा प्रकार पाहून उपळी गावातील गावकऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी धावाधाव सुरू केली. सोहेल सुमारे हजार फूट पुढे वाहून गेला, पण सुदैवाने तो नदीच्या काठाला लागला. गावकऱ्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.
प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
गेल्या आठ-दहा दिवसांपासून अंजना नदीच्या उगमावर ढगफुटीसदृश्य पाऊस पडत असल्याने नदीला मोठा पूर आला आहे. अनेक गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. उपळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांनी अशा धोकादायक परिस्थितीत पाण्यातून वाहने न चालवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.