धोकादायक जोगेश्वरी कुंडात अडकलेल्या गोमातेची थरारक सुटका! सुरक्षारक्षकांच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:33 IST2025-08-06T19:32:08+5:302025-08-06T19:33:14+5:30
वेरूळच्या डोंगरमाथ्यावर मृत्यूच्या छायेतून गोमातेची सुटका

धोकादायक जोगेश्वरी कुंडात अडकलेल्या गोमातेची थरारक सुटका! सुरक्षारक्षकांच्या प्रयत्नांना यश
- सुनील घोडके
खुलताबाद: अंत्यत धोकादायक असलेल्या वेरूळ लेणीच्या डोंगरमाथ्यावरील जोगेश्वरी लेणीच्या कुंडात अडकलेल्या गोमातेला सुरक्षारक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून सुखरूप बाहेर काढले आहे. जोगेश्वरी आणि गणेश लेणी परिसर येथील कुंडांमुळे अंत्यत धोकादायक असून याठिकाणी पर्यटकांनी देखील सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे.
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी क्रमांक २९ च्या वर जोगेश्वरी कुंड व गणेश लेणी आहे. जोगेश्वरी कुंडातून येळगंगा नदी वाहते व तेच पाणी वेरूळ लेणी धबधबा म्हणून खाली जोरदारपणे कोसळते. जोगेश्वरी कुंड अंत्यत धोकादायक व खोल आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या आसपास सुरक्षारक्षक पुंडलिक सोनवणे हे जोगेश्वरी कुंड व गणेश लेणी परिसरात कर्तव्यावर होते. त्यांना जोगेश्वरी कुंड परिसरातील सर्वात धोकादायक असलेल्या गुप्तकुंडावर एक गाय अडकलेली दिसली. या ठिकाणी पाण्याचा जोरदार प्रवाह असतानाही गाय जीव वाचवत मोठ्या प्रयत्नाने कुंडाच्या काठावर तग धरून होती.
दोन तासांत काढले बाहेर
सुरक्षारक्षक सोनवणे यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर अर्ध्यातासात सचिन ठाकरे, प्रदीप साहू, अमोल टाकळकर, शिवाजी मिसाळ, अनिल बोडखे, सचिन राठोड, गणेश चव्हाण, सागर दळवी, प्रकाश सोनवणे, प्रेमचंद वानरे, रामू गायकवाड, बाबासाहेब चव्हाण, बाळू गोल्हार, संदीप पवार, विजय ऋषी, परमेश्वर अर्जूने, ज्ञानेश्वर गायकवाड हे एसआयएसचे सुरक्षारक्षक व पुरातत्व विभागाचे विनोद कणसे, अनिल सोनवणे, लहू बरडे आदींनी जोगेश्वरी कुंड परिसरात दोरी व मोठे नाडे याच्या साह्याने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढून सुटकेचा निश्वास सोडला.
वेरूळ लेणीच्या वरच्या जोगेश्वरी लेणी परिसरातील जीवघेण्या कुंडात अडकलेल्या गोमातेची सुखरूप सुटका; सुरक्षारक्षकांनी दाखवली धाडसाची झलक #ChhatrapatiSambhajinagar#ElloraCaves#marathwadapic.twitter.com/bAssmYylTh
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 6, 2025
काही दिवसांपूर्वीच युवकाचा मृत्यू
यावेळी सचिन ठाकरे यांनी सांगितले की, गाय ही गुप्तकुंडावर अडकलेले होती. याठिकाणी जोरदार पाणी कोसळत असल्याने पाण्याचे जोरदार प्रवाह होता. यदा कदाचित गाय खाली कुंडात पडली असती तर जिवंत राहिली नसती. शिवाय कुंड खुप खोल असल्याने शोध घेण अशक्य झाले असते. गेल्या वर्षी याच ठिकाणी एक बैल खाली पडून मृत्युमुखी पडला होता. तर काही दिवसांपूर्वीच पर्यटनासाठी आलेला एक युवक भावाला वाचविताना कुंडात पडून मृत्युमुखी पडला होता.
धोकादायक कुंड
जोगेश्वरी कुंड, गणेश लेणी परिसर अंत्यत धोकादायक असून या ठिकाणी पर्यटकांनी जाऊच नये असे आवाहन भारतीय पुरातत्व विभागाचे संवर्धन सहाय्यक राजेश वाकलेकर यांनी केले आहे.