छ. संभाजीनगरात पहाटेच्या सुमारास थरार! हातात शस्त्र घेऊन तरुण-तरुणीचा भररस्त्यात राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:21 IST2026-02-06T19:20:32+5:302026-02-06T19:21:03+5:30
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यात दोघांमधील झटापट स्पष्ट दिसत आहे.

छ. संभाजीनगरात पहाटेच्या सुमारास थरार! हातात शस्त्र घेऊन तरुण-तरुणीचा भररस्त्यात राडा
छत्रपती संभाजीनगर: शहरातील नागेश्वरवाडी परिसरात ३१ जानेवारीच्या पहाटे एका तरुण आणि तरुणीने केलेल्या जोरदार गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तरुणीच्या हातात शस्त्रसदृश वस्तू असल्याने आणि दोघांमध्ये मोठी झटापट झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, एक २५ ते ३० वयोगटातील तरुण स्पोर्ट्स बाईकवरून नागेश्वरवाडीत आला होता. त्याच वेळी एक तरुणी हातात शस्त्र घेऊन त्याच्या दिशेने धावत आली. दोघांमध्ये साधारण अर्धा तास कडाक्याचे भांडण सुरू होते. तरुणी मोठ्याने रडत आरडाओरड करत होती, तर तरुण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तरुणीने रस्त्याच्या मधोमध ठाण मांडल्याने पहाटेच्या शांततेत स्थानिकांना जाग आली. स्थानिकांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, दोघेही तेथून निघून गेले.
पोलीस म्हणतात, तक्रार नाही!
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यात दोघांमधील झटापट स्पष्ट दिसत आहे. मात्र, या धक्कादायक प्रकरणावर क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. हा वाद कौटुंबिक होता की प्रेमप्रकरणातून, याबाबत आता शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.