छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची गस्त सुरू असताना तरुणाची क्रूर हत्या, तीन मिनिट ओढत वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:47 IST2025-11-11T11:41:43+5:302025-11-11T11:47:23+5:30
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गेट परिसरात मध्यरात्री मोठा तणाव, हल्लेखोरांच्या वसाहतीत दगडफेक, वाहनांची तोडफोड, दंगा काबू पथकासह शीघ्र कृती दल तैनात

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची गस्त सुरू असताना तरुणाची क्रूर हत्या, तीन मिनिट ओढत वार
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे पोलिसांची गस्त सुरू असताना दुसरीकडे जुन्या वादातून इम्रान अकबर कुरेशी (३३, रा. सिल्लेखाना) या तरुणाची मोबाइल विक्रेत्यासह इतरांनी मिळून भररस्त्यावर धारदार शस्त्राने वार करत क्रूर हत्या केली. सोमवारी रात्री १०:३० वाजता पैठण गेट सब्जी मंडी रस्त्यावर हा हत्येचा थरार घडला. धक्कादायक बाब म्हणजे, जवळपास साडेतीन मिनिटे हल्लेखोर मृताला रस्त्यावर घसडत नेत संपूर्ण शरीरावर वार करत होते. मात्र, कोणीही त्यांना थांबवण्यासाठी पुढे आले नाही. परवेज शेख (३६) असे मुख्य हल्लेखोराचे नाव असून त्याच्यासह अन्य सर्व हल्लेखोर पसार झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान कुरेशी हा कुटुंबासह सिल्लेखाना परिसरात राहतो. जमीन खरेदी-विक्री व्यवसायासह तो अन्य छोटे-मोठे काम करतो. सोमवारी रात्री १०:३० वाजता इम्रान त्याचा भाऊ इब्राहिम सोबत पैठण गेट परिसरातील हल्लेखोर परवेजच्या एस. एस. टेलिकॉम दुकानासमोर गेले होते. तेथेच अंडा-भूर्जी खाऊन इम्रान परवेजच्या दुकानासमोर उभा असताना त्यांच्यात वाद उफाळून आला व तुंबळ हाणामारी सुरू झाली. परवेजच्या दुकानाची तोडफोडदेखील झाली. यातून वाद टोकाला पोहोचले. परवेज व त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी इम्रान व इब्राहिमवर हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी इम्रानचा गळा, कान व पोटात वार करण्यात आले. इम्रान रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला असताना संतप्त हल्लेखोर त्याला जमिनीवर ओढत नेत मारत होते. घटनेमुळे परिसरात एकच हलकल्लोळ उडाला व मोठी धावपळ उडाली. इम्रान यांना रुग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू झाला होता. इब्राहिम यांच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.
बाजारपेठ बंद, दुकान बंद करून व्यापारी पळाले
बाजारपेठेतच भररस्त्यात हत्या झाल्याने पैठण गेट बाजारपेठेत तणाव निर्माण झाला. क्षणार्धात दुकाने बंद करून व्यापारी चालते झाले. रिक्षा स्टँडवर उभे रिक्षा चालक तत्काळ पळून गेले.
दंगा काबू पथक, शीघ्र कृती दलासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल
घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, क्रांती चौकचे पोलिस निरीक्षक सुनील माने, सिटी चौकच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताचे संतप्त नातेवाईक व मित्रपरिवार घटनास्थळी येत असल्याने दंगा बाबू पथकासह शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले. मात्र, तरीही जमावाला नियंत्रित करणे पोलिसांना कठीण जात होते.
दगडफेक व वाहनांची तोडफोड
घटनास्थळापासून काही अंतरावर हल्लेखोरांचे घर आहे. त्यांचे नातेवाईकही तिथे राहतात. त्यामुळे एकीकडे घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा असताना दुसरीकडे सब्जीमंडी परिसरात एका अनोळखी गटाने दगडफेक करून रिक्षा, कार, दुचाकींची तोडफोड केली. दंगा बाबू पथकाने धाव घेतल्यानंतर जमाव गल्लीबोळात पळून गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण परिसरात मोठा तणाव कायम होता.
तीन दिवसांपूर्वी झाला वाद
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व हल्लेखोरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. तीन दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात वाद झाला होता. सोमवारी दिल्लीत स्फोट झाल्याने शहरात हाय अलर्ट देण्यात आला. त्यामुळे क्रांती चौक पोलिस पैठण गेट परिसरात गस्त घालत होते. घटनास्थळापासून पोलिसांची वाहने पुढे जाताच ही क्रूर हत्या करण्यात आली.
घाटीतही मोठा तणाव
इम्रान यांच्या हत्तेची माहिती कळताच घाटी रुग्णालयात मोठा जमाव जमला. तेथे अनुचित प्रकार घडण्याच्या शक्यतेमुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी धाव घेतली. नातेवाइकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत होते.