जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 06:48 IST2025-09-09T06:46:45+5:302025-09-09T06:48:48+5:30
ही घटना गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथील नांमकाच्या मुख्य कालव्याजवळ ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता घडली.

जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव जीपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नीसह त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
ही घटना गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथील नांमकाच्या मुख्य कालव्याजवळ सोमवारी (दि. ८) सकाळी ७:३० वाजता घडली. सजन राजू राजपूत (२८), शीतल सजन राजपूत (२५) व कृष्णांश सजन राजपूत (१, सर्व रा. सटाणा, ता. वैजापूर) अशी मृतांची नावे आहेत.
सजन राजपूत हे पत्नी शीतल व एक वर्षाचा मुलगा कृष्णांशसह सोमवारी सकाळी सटाणा येथून दुचाकीने वैजापूर-गंगापूर मार्गे वाळूज औद्योगिक वसाहतीत जात होते.
यावेळी गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथील नांमका कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीपने राजपूत यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील तिघेही ५० फूट दूर फेकल्या गेले.
विसर्जनासाठी गेले होते गावी, परतताना दुर्घटना
सटाणा (ता. वैजापूर) येथील सजन राजपूत हे वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामाला होते. गणपती विसर्जनासाठी ते गावी गेले होते. सोमवारी ते वाळूजकडे निघाले होते.