तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘एसपीआय’ परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:34 IST2019-05-05T23:33:49+5:302019-05-05T23:34:29+5:30
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्यापूर्वी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या (एसपीआय) प्रवेशासाठी रविवारी शहरातील दोन केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ एकूण ३ हजार ५२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़

तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘एसपीआय’ परीक्षा
औरंगाबाद : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्यापूर्वी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या (एसपीआय) प्रवेशासाठी रविवारी शहरातील दोन केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ एकूण ३ हजार ५२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़
सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी राज्यातील चार केंद्र्रांमध्ये विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली़ ७ एप्रिलला नागपूर येथे निवृत्त मेजर जनरल विजय पवार यांच्या देखरेखीखाली १ हजार ४३८, कोल्हापूर येथे १३ एप्रिलला निवृत्त मेजर जनरल एस़ डी़ सोहनी यांच्या देखरेखीखाली १ हजार ४६९, पुणे येथे २८ एप्रिलला निवृत्त एअर कमांडर आऱ एच़ कपडे यांच्या देखरेखीखाली १ हजार ११५ जणांनी परीक्षा दिली़ चौथ्या टप्प्यामध्ये औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालय आणि गोदावरी हायस्कूल येथे परीक्षा घेण्यात आली़ गृहरक्षक राजीव मानेकर यांच्या देखरेखीखाली गोदावरी हायस्कूल, तर अधीक्षक सुभाष हरकळ यांच्या देखरेखीखाली मौलाना आझाद महाविद्यालय ३ हजार ५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़
लेखी परीक्षेचा निकाल ८ ते १० मे दरम्यान घोषित करण्यात येणार आहे़ सदर निकाल संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या साधारणत: ३०० ते ३२५ मुलांची निवड मुलाखतीसाठी करण्यात येणार आहे़ १३ ते १५ मे दरम्यान ‘क्विन मेडिटेक्निकल इन्स्टिट्यूट’ खडकी, पुणे आणि १८ ते २० मे औरंगाबादेतील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीद्वारे केवळ सात मुलांची अंतिम निवड करण्यात येईल, तर १० ते २० विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात येणार आहे़ यावर्षी निगेटिव्ह मार्किंगद्वारे गुणांकन असल्याने परीक्षार्थींचा चांगलाच कस लागणार आहे़