तलावात पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यु; सिल्लोड येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 18:00 IST2018-04-11T17:58:01+5:302018-04-11T18:00:45+5:30
शहरातील एमटीडीसी हॉटेलच्या मागे असलेल्या राजाळवाडी येथील तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.

तलावात पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यु; सिल्लोड येथील घटना
सिल्लोड : शहरातील रजालवाडी पाझर तलावावर पोहायला गेलेल्या तीन किशोर वयीन मुलांचा बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. मयत झालेले तिन्ही मुलं शहरातील ईदगाह परिसरातील अब्दालशहा नगर स्नेहनगर या वस्तीतील रहिवाशी आहेत. सोफियानखान युसुफखान पठाण ( 12), मोहमदखान उमरखान पठाण (13)व तालेबखान असिफखान पठाण (14) असे मृतांची नावे आहेत.
शहरातील स्नेहनगर, अब्दालशहा नगर परिसरात राहणारे मोहमदखान व तालेबखान हे दोघे चुलत भाऊ आहेत. त्यांचाच घरा शेजारी राहणारा सोफियानखान हे तिन्ही मुले मंगळवारी ( दि.१० ) दुपारी घरातून बाहेर गेले. मात्र संध्याकाळ पर्यन्त ते घरी आले नव्हते. नातेवाइकांनी बराच शोध घेतला परंतु तिघेही सापडले नाही. यामुळे त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तिन्ही मुले गायब झाल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी तिघांचा शोध सुरु केला.
याच दरम्यान आज दुपारी तीन वाजता शहरातील रजालवाडी पाझर तलावात तीन मुलांचे प्रेत आढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोउपनी शैलेश जोगदंड यांच्यासह नगरसेवक सुनील मिरकर,कमलेश कटारिया यांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. यानंतर मृत मुलांना नागरिकांच्या मदतीने तलावात बाहेर काढून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
नगराध्यक्षांची रुग्णालयात धाव
तीन मुलांचा तळ्यात बुडून मृत्यु झाल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठून मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही मुलांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.