छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
By सुमित डोळे | Updated: April 22, 2025 14:13 IST2025-04-22T14:09:30+5:302025-04-22T14:13:45+5:30
धमकीचा ईमेल प्राप्त होताच, हायकोर्ट प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल

छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
छत्रपती संभाजीनगर : येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज दुपारी सुमारे १२ वाजेच्या दरम्यान ही धमकीची माहिती समोर आली असून, तात्काळ सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
धमकीचा ईमेल प्राप्त होताच, हायकोर्ट प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे, हायकोर्ट सुरक्षाधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे शिवचरण पांढरे तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचे चार पथके, एटीएसचे पथक खंडपीठात दाखल झाले. सध्या संपूर्ण परिसरात तपासणी सुरू असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत आणि प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
हायकोर्टाचे कामकाज सुरळीत
दरम्यान, धमकी असूनही हायकोर्टातील कामकाज नियमित सुरू ठेवण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना न्यायालयात उपस्थित राहायचे आहे, त्यांना आत जाण्याची मुभा देण्यात आली आहे. कोणताही गोंधळ न होता पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी आपले काम शांतपणे आणि दक्षतेने पार पाडत आहेत. संपूर्ण घटनेची सायबर पोलिसांकडूनही कसून चौकशी सुरू असून, धमकी कुठून आली याचा तपास केला जात आहे.